बीड

धमकी, शिवीगाळ आणि विचारांवर हल्ला ‘शिवाजी कोण होता?’ 

धमकी, शिवीगाळ आणि विचारांवर हल्ला ‘शिवाजी कोण होता?’
पुस्तक प्रकरण पेटले वंचितचे बीडमधील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर सामूहिक वाचन
बीड (प्रतिनिधी) पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या बहुचर्चित पुस्तकावरून पुन्हा एकदा वाद पेटला असून लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट हल्ला झाल्याचा आरोप होत आहे. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोन करून अर्वाच्च शिवीगाळ करत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
“शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणारा पानसरे कोण? त्याची काय अवस्था झाली तुला माहीत आहे ना? तुला पण वर जायचे आहे का?” अशी धमकी देत गायकवाड यांनी प्रकाशकाला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावर न थांबता “पुस्तक छापणे बंद कर, नाहीतर घरात घुसून मारीन, चिरडून टाकीन, जीभ कापेन” अशा थेट हिंसक धमक्या दिल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेचा तीव्र निषेध करत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. “विचारांना गोळ्या घालणाऱ्यांना उत्तर वाचनानेच दिले जाईल,” असा स्पष्ट इशारा देत ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडी बीड जिल्ह्याच्या वतीने बीड शहरात मोठ्या उत्साहात पुस्तक वितरण व सामूहिक वाचन कार्यक्रम पार पडला. माजी जिल्हाध्यक्ष अजय सरवदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमात शिव, फुले, शाहू, आंबेडकरी विचारांचा जागर करण्यात आला. उपस्थित कार्यकर्त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वैज्ञानिक आणि पुरोगामी दृष्टीकोनातून समजला पाहिजे” असा ठाम संदेश दिला.
कार्यक्रमाला डॉ. गणेश ढवळे, ज्ञानेश्वर कवठेकर, प्रा. वसंत ओगले, अनिल डोळस, पप्पू गायकवाड, किरण वाघमारे, पुष्पाताई तुरुकमाने, अर्जुन जावंजाळ, प्रेम कांबळे, प्रवीण टाकणकार, दीपक कांबळे, ॲड. सदानंद वाघमारे, संतोष जोगदंड, शामसुंदर जाधव, ॲड. उदय तुपारे, शिवेंद्रसिंह सोनवणे, कृष्णा हातागळे, मल्हारी जाधव, लखन जोगदंड, मिलिंद सरपते, राजेश कुमार जोगदंड आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Back to top button