भव्य आयोजन नसतानाही लोकनेत्याच्या अभिवादनासाठी गोपीनाथ गडावर मोठी गर्दी!

ना.पंकजाताई मुंडे यांचे सामाजिक बांधिलकीची साद घालणारे भाषण ; शेती, शेतकरी, वृक्षारोपण, ऊसतोड कामगारांच्या हिताचा जाहीर केला संकल्प
दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने राहा- पंकजाताई मुंडे
‘एक पेड बाप के नाम’ उपक्रम प्रत्येकाने राबवावा ; नवरात्रात नवा संकल्प जाहीर करणार
सर्व नेते येऊन गेले, भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही गोपिनाथगडावर येतील
परळी वैजनाथ, दि. ०३—
लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज गोपीनाथ गडावर दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंधन बचत आवाहनाला प्रतिसाद म्हणून भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित नसतानाही लोकनेत्यास अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याप्रसंगी राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरणपूरक लोकसहभागाला साद घालणारे भाषण करत वृक्षारोपण,जैविक व नैसर्गिक शेती ,स्वाभिमान, समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, आणि शेतकरी हितासाठी रचनात्मक काम असे संकल्प जाहीर केले. सर्वांनी हे संकल्प पूर्ण करावे आणि पर्यावरणीय सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी योगदान द्यावे असे सांगत दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने राहा असे आवाहन केले.
लोकनेते मुंडे साहेब यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम आज गोपीनाथगडावर अत्यंत साधेपणाने झाला. यावेळी ना.पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ. प्रीतमताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई, जावई गौरव खाडे , नातू आर्यमन पालवे,अगस्त्य खाडे, बंधू अजय मुंडे, रामेश्वर मुंडे यांसह मुंडे कुटुंबियांनी समाधीचे दर्शन घेतले.त्याबरोबर मुंडे साहेबांना आवडणाऱ्या पदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. याप्रसंगी आयोजित भजनाच्या कार्यक्रमात ना पंकजाताई मुंडे यांनी कुटुंबासह सहभाग घेतला. कार्यक्रमास महंत राधाताई सानप, आ.नमिता मुंदडा, माजी मंत्री बदामराव पंडित, बाळदादा पवार, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, वैद्यनाथ बँकेचे चेअरमन विनोद सामत, व्हाईस चेअरमन रमेश कराड, भाजप नेते गणेश हाके, प्रवीण घुगे, भाजपा जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, माधवराव निर्मळ,योगेश क्षीरसागर , प्रा.लक्ष्मण हाके, गायताई कराड,, राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी न. प. गटनेते वैजनाथ सोळंके,, भाजप गटनेते प्रा.पवन मुंडे, भाजपा प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी, आदींसह बीड जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी भाजप पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
माझा प्रत्येक श्वास वंचित, पीडित, गरजूंसाठी
———
यावेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, एक तप उलटले तरी साहेबांच्या आठवणी विसरता येत नाहीत. मुलगी म्हणून माझ्या वाट्याला आलेल्या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य मी मुंडे साहेबांना शोभेल अशा पद्धतीने पार पाडली आहेत. स्वाभिमान जपत, सामाजिक सलोख्यासाठी जाती-धर्मांच्या भिंती भेदून अठरापगड जाती धर्मासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे. बारा वर्षे झाली, पण मुंडे साहेबांचे पुण्यस्मरण करताना तुमचे निरपेक्ष प्रेम बघून आजही माझा प्रत्येक श्वास जनतेकडे गहाण ठेवून काम करत आहे. स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या निधनानंतर तुमची व माझी कधीही भरून न येणारी अशी हानी झालेली आहे. तीन जून रोजी याच ठिकाणी मी माझ्या हाताने माझा पिता आणि आपला नेता यांना अखेरचा निरोप दिला आहे. आजही मला आणि माझ्या आईला २ जूनची भयाण रात्र आठवते. साहेबांनी अगदी शून्यापासून संघर्षमय प्रवास केला. “आयुष्य लांब असण्यापेक्षा मोठे असावे,” याप्रमाणे आपल्या कर्तुत्वाने आज साहेबांचे स्थान घराघरातील देव्हाऱ्यात आहे असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना समाजासाठी झटण्याचा संदेश दिला.माझा प्रत्येक श्वास वंचित, पीडित आणि गरजूंसाठी आहे.आपल्या पेक्षा दुर्बल असलेल्या व्यक्तींना मदतीचा हात द्या. दोन घास कमी खा, पण स्वाभिमानाने जगा, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.
‘एक पेड बाप के नाम’, गडावर वृक्षारोपण ; उपस्थितांना रोपांचे वाटप
————-
पर्यावरणासमोरील आव्हानांचा उल्लेख करत पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘ एक पेड मॉ के नाम’ उपक्रमाबरोबरच “एक पेड़ बाप के नाम” हा संकल्प राबविण्याचे आवाहन केले. प्रत्येकाने किमान ११ झाडे लावून त्यांचे संवर्धन करावे, प्रत्येकानी कौटुंबिक ,सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रमात वृक्षारोपण करावे आणि त्याचे संवर्धन करावे असे त्यांनी सांगितले. या संकल्पाची सुरुवात त्यांनी गडाच्या परिसरात वृक्षारोपण करून केली. यावेळी विविध वृक्षांची सुमारे एक हजार रोपे उपस्थितांना वाटप करण्यात आली.
शेती, शेतकरी, ऊसतोड कामगारांच्या बांधिलकीचा संकल्प
—————
शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना ना. पंकजाताई मुंडे यांनी सांगितले की, रासायनिक खतांऐवजी जैविक व नैसर्गिक शेतीचा आग्रह धरला पाहिजे. या संकल्पाची सुरुवात मी स्वतः पासून करणार असून मी स्वतः आता जैविक व नैसर्गिक प्रत्यक्षात करणार आहे आपण सर्वांनी यासाठी योगदान दिले पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनाशी एकरूप होण्याकरिता “जावे त्यांच्या वंशा, तेव्हा कळे’ या न्यायाप्रमाणे मी स्वतः नांगर धरणार, ट्रॅक्टर चालवणार आणि शेती करणार आहे अशी घोषणा त्यांनी केली. तसेच ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी एकरूप होत त्यांच्या सोबत 12 डिसेंबरला प्रत्यक्ष ऊसाच्या फडात जाऊन ऊसतोडणी करण्याचाही संकल्प त्यांनी व्यक्त केला.
नवरात्रोत्सवात नवा सामाजिक संकल्प जाहीर करणार
———————-
आज पर्यावरणाला पूरक होतील अशा प्रकारचे संकल्प आपण हाती घेतले आहेत यासाठी मी स्वतः निर्धार केला आहे आपणही या संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन यावेळी पंकजाताई मुंडे यांनी केले. तसेच आगामी नवरात्रोत्सवात नवा सामाजिक संकल्प जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सामाजिक सलोखा आणि विकासाच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील सामाजिक घडी अधिक मजबूत करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भविष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ही गोपीनाथ गडावर येतील
———————
वंचित ,उपेक्षित ,दुर्बल घटकांना न्याय देण्याची भूमिका आयुष्यभर जपणाऱ्या आपल्या मुंडे साहेबांना अभिप्रेत असेच काम तुम्ही आणि मी आपण सर्वांनी करायचे आहे. आपण जसे वागू तसे परिणाम दिसत असतात. त्यामुळे स्वाभिमान जपत आपण स्वर्गातही मुंडे साहेबांची मान उंचावेल असेच काम केले पाहिजे. सामाजिक सलोखा आणि आपल्यापेक्षा क्षीण व्यक्तीच्या मदतीला आपण आले पाहिजे. जागतिक स्तरावर आज संकटाची परिस्थिती असून आपल्या देशात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने आपल्याला आवाहन करत आहेत. या देश कार्यात आपण सहभाग घेतला पाहिजे. आपल्या कृतीतून आणि माणसाला माणूस म्हणून जगता यावे या उद्देशाने प्रत्येकाने योगदान देणे अभिप्रेत आहे. गोपीनाथ गडाच्या उभारणीला अमित शहा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक मंत्री, अनेक पक्षप्रमुख आले होते. सर्वच शीर्षस्थ नेते आपल्या गडावर येऊन गेले आहेत आता एकमेव पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या गडावर यायचे राहिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भविष्यात गोपीनाथ गडावर नक्कीच येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दिवंगत एजाजभाई देशमुख यांच्या परिवाराला पाच लाख रुपयांची मदत
———–
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष बीड येथील दिवंगत नेते एजाजभाई देशमुख यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवाराला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली होती. आजच्या स्मृतीदिनी ना. पंकजाताई मुंडे यांनी एजाजभाई यांच्या कुटुंबियांना आज ५ लाख रुपयांचा धनादेश त्यांच्या परिवाराकडे सुपूर्द करून आपला दिलेला शब्द पाळला.
••••



