बीड

इतरांसाठी सतत काहीतरी चांगले करण्याची वृत्ती विकसित करा- ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे

इतरांसाठी सतत काहीतरी चांगले करण्याची वृत्ती विकसित करा- ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे

*बीडमध्ये ‘अधिकमास महात्म्य’ कथा सोहळा; खटोड प्रतिष्ठानचा उपक्रम*
बीड, दि. ११ (प्रतिनिधी): माणसाला ज्यावेळी प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची खरी किंमत कळते, त्यांनाच खऱ्या अर्थाने अनुकूल दिवसांचे मोल समजते. त्यामुळे जीवनात कितीही वैभव किंवा मोठेपण प्राप्त झाले तरी, आपल्या भूतकाळातील संघर्षाची परिस्थिती विसरू नका. उलट, त्या अनुभवातून इतरांसाठी सतत काहीतरी चांगले करण्याची वृत्ती विकसित करा, असे प्रेरणादायी प्रतिपादन अहिल्यानगर येथील निरुपणकार ह.भ.प. गीतांजलीताई झेंडे यांनी केले.
येथील स्वर्गीय झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित ‘अधिकमास महात्म्य’ कथेच्या चौथ्या दिवशीचे पुष्प गुंफताना त्या मंगळवारी (दि.१२) बोलत होत्या. याप्रसंगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते गीतांजलीताई झेंडे यांचा सत्कार करण्यात आला.
कथा भागातून उपदेश करताना त्या पुढे म्हणाल्या की, आजच्या धावपळीच्या युगात मन शुद्ध ठेवणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी संतांचे विचार हेच खरे दिशादर्शक आहेत. आज समाजात वैभव संपन्नता वाढली असली तरी, अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होताना दिसते. प्रत्येक मनुष्याने अन्नाचा कण न् कण जपला पाहिजे आणि अन्नाची नासाडी होणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे.
संत संगतीतच खऱ्या अर्थाने माणूस घडत असतो, असे सांगून झेंडे म्हणाल्या की, आपल्यामुळे इतरांचे कल्याण व्हावे हीच खरी माणुसकीची भावना आहे. जीवनात चांगले संकल्प करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करा. विशेषतः भक्तीचा मार्ग हा जीवनात लवकर समजला पाहिजे; परमार्थासाठी वाट पाहू नका. आयुष्यात जर माणूस इतरांच्या सुखात दुःखी होत असेल, तर ती मानवी जीवनाची मोठी शोकांतिका आहे. भारतीय संस्कृती आणि संस्कारांमध्ये दर तीन वर्षांनी येणाऱ्या ‘अधिकमासा’ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व आजच्या तरुण पिढीला समजावे, या उदात्त हेतूने गौतम खटोड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या काळात अधिकाधिक परमार्थ करावा आणि एकादशीचे व्रत अंगीकारून आपले पुण्य वृद्धिंगत करण्याची ही मोठी संधी असल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या कथा सोहळ्याला बीड शहरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असून, टाळ-मृदंगाच्या गजरात आणि आध्यात्मिक विचारांनी नाट्यगृह दुमदुमून गेले.
Back to top button