बीड

उमापूरमध्ये भक्तीचा जल्लोष; नारायणगडच्या नारळी सप्ताहाने निर्माण केली आध्यात्मिक ऊर्जा

उमापूरमध्ये भक्तीचा जल्लोष; नारायणगडच्या नारळी सप्ताहाने निर्माण केली आध्यात्मिक ऊर्जा

पठाडे महाराजांच्या ओजस्वी कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध; पादुकांच्या हेलिकॉप्टर आगमनाने सोहळ्याला भव्यतेची जोड

उमापूर (ज्ञानदेव काशिद कार्यकारी संपादक ) 

श्री क्षेत्र नारायणगड संस्थानच्या ७४ व्या नारळी सप्ताहाची उमापूर येथे अतिशय भव्य, दिव्य आणि भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून, संपूर्ण परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळत आहे. गावागावातून आलेल्या हजारो भाविकांच्या उपस्थितीमुळे उमापूर नगरी अक्षरशः भक्तीच्या सागरात न्हाऊन निघाली आहे.

या सप्ताहाच्या प्रारंभीच युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांनी आपल्या ओजस्वी वाणीमध्ये “उमापूरमध्ये भक्तीचा महापूर आला आहे,” उपस्थित भाविकांमध्ये आध्यात्मिक ऊर्जा निर्माण केली. सप्ताहाचे उद्घाटन महंत शिवाजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी महंत संभाजी महाराज, दत्ता महाराज गिरी यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे परिसरात भक्तिभावाचे वातावरण अधिकच गडद झाले.

आज सकाळी नारायणगड येथून नगदनारायण महाराज यांच्या पादुका महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते हेलिकॉप्टरद्वारे उमापूर येथे आणण्यात आल्या. या अभूतपूर्व सोहळ्याने कार्यक्रमाची भव्यता अधिकच खुलून आली. पादुकांचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात भव्य दिव्य दिंडी सोहळा पार पडला. त्यानंतर फुलांची उधळण करत भाविकांनी भक्तिभावाने स्वागत केले.

सप्ताहातील पहिले कीर्तनपुष्प युवा कीर्तनकार ज्ञानेश्वर पठाडे माऊली यांनी गुंफले. आपल्या कीर्तनातून त्यांनी सांगितले की, “नारायणगडचा फिरता नारळी सप्ताह म्हणजे लोकांचे ऊर्जाकेंद्र आहे. ही परंपरा केवळ धार्मिक नसून समाजाला एकत्र आणणारी, प्रेरणा देणारी आहे. भक्तिसंप्रदायातील सर्व गडांचा जनक म्हणून नारायणगडाची ओळख असून, ही परंपरा समाजाला दिशा देणारी आहे.” तसेच, उमापूरमधील तरुणांनी आपली शक्ती, वेळ आणि श्रम पणाला लावून हा सोहळा यशस्वी करण्यासाठी घेतलेली मेहनतही त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.

यावेळी पठाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या
“पडता जडभारी | दासी आठवावा हरी
मग तो होऊ नेदी सिण | आड घाली सुदर्शन
नामाच्या चिंतने | बारा वाटा पळती विघ्ने
तुका म्हणे प्राण | करा देवासी अर्पण”
या अभंगावर अत्यंत प्रभावी आणि हृदयस्पर्शी चिंतन मांडले. नामस्मरणाची ताकद, संकटसमयी हरिनामाचे महत्त्व आणि पूर्ण समर्पणाची भावना त्यांनी अत्यंत सुंदररीत्या उलगडून सांगितली. त्यांच्या प्रभावी निरूपणाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.

दुपारच्या सत्रात समाधान महाराज शर्मा यांनी रामकथेच्या माध्यमातून भक्तांना आध्यात्मिक बळ दिले. त्यांच्या कथनातून रामभक्ती, आदर्श जीवन आणि धर्माचरण यांचे महत्त्व अधोरेखित झाले.

सप्ताहादरम्यान मोठ्या प्रमाणात अन्नदान सुरू असून, हजारो भाविक त्याचा लाभ घेत आहेत. त्याचप्रमाणे गाथा भजन, हरिपाठ आणि संगीत भजन असे दैनंदिन धार्मिक कार्यक्रमही अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावात पार पडत आहेत. या सतत सुरू असलेल्या उपक्रमांमुळे उमापूर परिसरात अखंड भक्तिरसाची अनुभूती मिळत आहे.

आजच्या कीर्तन सोहळ्यास हजारो भाविकांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली. उमापूरमध्ये सध्या श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकात्मतेचे सुंदर दर्शन घडत असून, आगामी दिवसांतही विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे हा उत्सव अधिकच रंगतदार होणार आहे. फुले टाकण्याच्या कार्यक्रमाला गडाचे सर्व विश्वस्त मंडळ उपस्थित होते.

Back to top button