बीड

जामखेड येथे शिवकालीन युद्ध कला शिबिर १० मे पासून सुरू

जामखेड येथे शिवकालीन युद्ध कला शिबिर १० मे पासून सुरू

श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्थेचा सामाजिक उपक्रम

जामखेड (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील पारंपरिक युद्धकलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने जामखेड शहरात सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री शंभुसूर्य मर्दानी खेळ, योग व मल्लखांब प्रशिक्षण संस्था, जामखेड यांच्या वतीने १० मे ते २० मे २०२५ दरम्यान सुमंगलनगर, जामखेड येथे शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात लाठी-काठी, धनुर्विद्या, ढाल-तलवार, भाला, दांडपट्टा यांसारख्या ऐतिहासिक शस्त्रकलेसह योगासन, प्राणायाम,स्वसंरक्षण,आणि संस्कारवर्गाचेही प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शिबिराची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे महिला व मुलींसाठी स्वतंत्र महिला प्रशिक्षकांची विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे, जेणेकरून त्यांना शास्त्रशुद्ध व सक्षम प्रशिक्षण मिळू शकेल.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा मुख्य प्रशिक्षक श्री बबलु (वस्ताद) टेकाळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “हे शिबिर युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, आत्मविश्वास आणि शारीरिक सक्षमता वाढविणारे ठरणार असून, या शिबिराचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आम्ही करीत आहोत.”

नावनोंदणी ऑनलाईन तसेच फोनवरही करता येणार असून शिबिरात सहभागी होण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*संपर्क:*
श्री. बबलु (वस्ताद) टेकाळे – ९८२२२७७३५७
श्री. अमोल निमोणकर – ९९७५१८६३७५

Back to top button