महाराष्ट्र

अंजनगाव सुर्जीच्या रणधुमाळीत एकनाथ शिंदेंची एन्ट्री; रोड-शोमुळे प्रचाराला नवा वेग

– पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;

अंजनगांव सुर्जी शहर सध्या निवडणुकीच्या धगधगत्या वातावरणाने भारलेले असून, नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या होणाऱ्या प्रचार दौऱ्यामुळे शहरातील राजकीय चित्र अधिकच रंगतदार झाले आहे.

दिनांक १८/१२/२०२५ रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन शहरातील श्रीमती राधाबाई सारडा महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर होणार असून, त्यानंतर ते भव्य रोड-शोमध्ये सहभागी होणार आहेत. अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार अभिजित आनंदराव अडसूळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. सुर्जी अंजनगाव येथील द्वारका चौकापासून संत रुपलाल महाराज मंदिर परिसरापर्यंत निघणाऱ्या या रोड-शोच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधणार असून, सभेतून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाने यावेळी नगराध्यक्ष पदासाठी डॉ.स्पृहा अतुल ठाकरे यांना अधिकृत उमेदवारी दिली असून, नगर परिषद सदस्य पदासाठीही ताकदीचे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. उपमुख्यमंत्री स्वतः प्रचारात सक्रिय झाल्याने पक्षाच्या मोहिमेला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी २ डिसेंबर रोजी होणारे नगरपालिकेचे मतदान स्थगित झाल्यानंतर नव्या आरक्षणाच्या प्रक्रियेनुसार आता २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. ही निवडणूक चुरशीची ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

दरम्यान, शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना केल्या आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या चौकात, मुख्य मार्गांवर तसेच संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली दंगारोधी पथक व विशेष पोलीस दल सज्ज ठेवण्यात आले आहे. नागरिकांनी शांतता राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाने यावेळी केले आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यामुळे अंजनगाव सुर्जीतील निवडणूक प्रचाराला नवी गती मिळाली असून, शहर सध्या राजकीय चर्चांचे केंद्रबिंदू बनले आहे. आता सर्वांचे लक्ष २० डिसेंबरच्या मतदानाकडे आणि त्यानंतर २१ डिसेंबरला जाहीर होणाऱ्या निकालाकडे लागले आहे.

Back to top button