बीड

वसंतदादा पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे आयोजन.

वसंतदादा पाटील महाविद्यालयात जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे आयोजन.
पाटोदा दि. ४ डिसेंबर रोजी येथील नवगण शिक्षण संस्था राजुरी( न. )संचलित वसंतदादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील  राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सूक्ष्मजीवशास्र विभाग यांच्या वतीने जागतिक एड्स दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर, अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बळीराम राख , तर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य नामदेव चांगण, पर्यवेक्षक प्रा. अनिल जोगदंड  यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत शब्दसुमनांनी केल्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना  विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी एक डिसेंबर जागतिक एड्स दिनाच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले. या छोटेखानी कार्यक्रमाच्या व्याख्यानामध्ये बोलताना  उपप्राचार्य डॉ. अभय क्षीरसागर यांनी, एड्स या रोगा विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ” एच आय व्ही ची लागण रोखावयाची असेल तर, असुरक्षित  संबंध, रक्तातून होणारे संक्रमण, मातेकडून गर्भातील बाळाला होणारे संक्रमण याविषयी समाजात जनजागृती करणे गरजेचे असून सर्वांनी काळजी घेणेही महत्त्वाचे आहे, शिवाय एचआयव्ही बाधित व्यक्तींना उपेक्षितपणाची वागणूक न देता त्यांना सहानुभूतीपूर्वक व मानवता वादी वागणूक देऊन त्यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी प्रेरित करावे” असेही आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.बळीराम राख यांनी, ” एच आय व्ही, एड्स याविषयी समाजात असलेले समज- गैरसमज दूर करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी एड्स जनजागृती विषयी पथनाट्य बसवून ते गावागावात जाऊन सादर करून त्या माध्यमातून समाजात जनजागृती घडून आणणे काळाची गरज आहे  “, असेही प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राष्ट्रीय सेवा योजनेचे सह कार्यक्रमाधिकारी  प्रा. डॉ . लक्ष्मण गाडेकर  यांनी,तर उपस्थितांचे आभार  राष्ट्रीय सेवा योजनेच्या सह कार्यक्रमाधिकारी प्रा. मनिषा गाडवे यांनी मानले. या कार्यक्रमाला, महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी  आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Back to top button