बीड

लिंबागणेश जिल्हा परिषद शाळेत बालदिन उत्साहात साजरा

लिंबागणेश जिल्हा परिषद शाळेत बालदिन उत्साहात साजरा
पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन
(लिंबागणेश प्रतिनिधी) :- दि.(१४)बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांवरील नेहरूजींच्या अपार प्रेमाचा वारसा जपण्यासाठी दरवर्षी हा दिवस देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो, याची माहिती प्रास्ताविकात देण्यात आली.
कार्यक्रमातील वक्त्यांनी नेहरूजींच्या विचारांवर भाष्य करताना सांगितले की,
“आजची मुले म्हणजे उद्याचा भारत” हे नेहरूजींचे मौलिक विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. प्रत्येक मुलामध्ये अपार कल्पनाशक्ती, क्षमता आणि देश घडवण्याची ताकद दडलेली असते, यावर त्यांनी विशेष भर दिला होता. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य आणि संरक्षण यांसाठी नेहरूजींनी राबवलेल्या उपक्रमांची आठवणही यावेळी करून देण्यात आली.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली पंडित नेहरूंच्या वेशभूषेची नक्कल. नेहरू टोपी, गुलाब फुल आणि त्यांच्या अद्वितीय शैलीसह लहान मुलांनी केलेल्या भूमिकांनी वातावरण भारावून गेले आणि उपस्थितांकडून दाद मिळवली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक श्री. दीपक घाटे होते.
प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार हरिओम क्षीरसागर उपस्थित होते.
तसेच सहशिक्षिका श्रीमती सुवर्णा गीते यांचीही लक्षणीय उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती सुवर्णा अयाचित यांनी केले, तर आभारप्रदर्शन श्रीमती ज्योती सानप यांनी केले.
Back to top button