विठ्ठल रुक्मिणी मंदिर यशवंत नगर जालना येथे श्रीमद् भागवत कथेनं भक्तीचा महासागर निर्माण केला

जालना (प्रतिनिधी) :जालना शहरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर यशवंत नगर येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेली श्रीमद् भागवत कथा भक्तीमय वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या सात दिवसांच्या कार्यक्रमाचे प्रमुख कथावाचक ह.भ.प. ज्योतिषाचार्य बबन देव महाराज जोशी (बीड) यांनी आपल्या मधुर, प्रभावी आणि ज्ञानदायी वाणीने कथा सादर करून उपस्थित भाविकांना अध्यात्म, धर्म आणि भक्तीचा सुंदर संगम अनुभवायला लावला.
या कालावधीत भगवान श्रीकृष्णाचे बाललीला, भक्त प्रल्हादाची कथा, गोवर्धन पूजा, गीतेचा उपदेश, रुक्मिणी विवाह, आणि श्रीकृष्ण-उद्धव संवाद या भावनिक प्रसंगांनी रसिकांना आध्यात्मिक आनंद दिला. कथा केवळ श्रवणीय नव्हे, तर दृश्यकलांनी सजलेली होती. पात्रांची आकर्षक वेशभूषा, संगीतमय सादरीकरण, आणि महाराजांच्या हृदयस्पर्शी वाणीमुळे दररोज मोठ्या संख्येने भक्तगण उपस्थित राहत होते.
या सात दिवसीय कार्यक्रमात परिसरातील महिला मंडळ, तरुणाई, ज्येष्ठ नागरिक आणि बालकांनाही उत्स्फूर्त सहभाग होता. प्रत्येक दिवशी कथा श्रवणासाठी येणाऱ्या भक्तांच्या गर्दीने यशवंत नगर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
या भक्तिपर्वाला विशेष शोभा आणली ती मान्यवरांच्या उपस्थितीने. कथा श्रवणासाठी माजी आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे यांच्या सौभाग्यवती सौ. मनीषा ताई टोपे, तसेच परतुरचे आमदार मा. बबनराव लोणीकर यांच्या सौभाग्यवती सौ. लोणीकर ताई या सातही दिवस भक्तिभावाने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घेत होत्या. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले.
सातव्या दिवशी काल्याचा सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.
“उपजोनिया पुढती येऊ, काला खाऊ दहीभात” या पारंपरिक अभंगाने सुरू झालेल्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाचा भव्य समारोप झाला.
ह.भ.प. बबन देव महाराज जोशी यांनी कीर्तनातून भगवान श्रीकृष्णाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवताना सांगितले की —
> “आपण अगोदर दुसऱ्याला खाऊ घाला, नंतर आपणही खा — हा भगवंताचा खरा संदेश आहे. इतरांना आनंद देणे, हीच खरी सेवा आणि भक्ती आहे.”
त्यांच्या या संदेशाने उपस्थित श्रोते भावविव्हळ झाले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या अखेरीस आभार प्रदर्शन बोराडे सरांनी करून सर्व मान्यवर, आयोजक, ग्रामस्थ आणि कथा रसिकांचे मन:पूर्वक आभार मानले.
या सात दिवसांच्या श्रीमद् भागवत कथेतून भक्ती, सेवा, ज्ञान, आणि संस्कारांचा संदेश देत ह.भ.प. बबन देव महाराज जोशी यांनी जालना शहरात अध्यात्माचा दीप प्रज्वलित केला. कार्यक्रमाची सांगता भक्तिरस, गोडवा आणि आत्मशांतीने भारलेली ठरली.



