अतिवृष्टीचा फटका शांतीराज कापड दालनाला ; सुनंदा पवार यांची पाहणी

जामखेड | प्रतिनिधी
जामखेड शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पेठेतील शांतीराज कापड दालनाचे मालक शांतीलाल गुगळे यांच्या दुकानालाही पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त तथा आमदार रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी जामखेड दौऱ्यावर असताना नुकतीच भेट दिली.
सुनंदा ताईंनी या भेटीत शांतीलाल गुगळे यांचे सुपुत्र आनंद गुगळे यांच्याशी संवाद साधत झालेल्या नुकसानीची माहिती घेतली. पावसामुळे व्यापाऱ्यांवर आलेल्या संकटाच्या काळात त्यांना धीर देत, अशा वेळी एकमेकांना आधार देणं हीच खरी माणुसकी आहे. शासनस्तरावर व स्थानिक पातळीवर मदतीसाठी प्रयत्न होणार आहेत,असे त्यांनी सांगितले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत व्यापाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असताना सुनंदा पवार यांच्या या भेटीमुळे व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.



