बीड
कबड्डी भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा खेळ -श्री. प्रमोद गोरकर

कबड्डी भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा खेळ -श्री. प्रमोद गोरकर
गढी महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचा समारोप
प्रतिनिधी गढी – जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शिवाजीनगर गढी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 8 व 9 सप्टेंबर 2025 रोजी आंतरमहाविद्यालयीन कबड्डी (पुरुष) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या स्पर्धेच्या समारोप व बक्षीस वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रशासन अधिकारी श्री प्रमोद गोरकर, सहप्रशासन अधिकारी श्री काशिनाथ गोगुले व लेखापाल श्री प्रतापराव हातोटे, तसेच प्र. प्राचार्य डॉ. सदाशिव सरकटे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कदम हे उपस्थित होते. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते या आंतर महाविद्यालयीन कबड्डी(पुरुष) स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या ऍड. बी..डी.हंबर्डे महाविद्यालय आष्टी व उपविजेता ठरलेला आर. बी. अट्टल महाविद्यालय गेवराई या दोन्ही संघाना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. प्रमोद गोरकर यांनी असे प्रतिपादन केले की कबड्डी हा एक लोकप्रिय भारतीय खेळ असून, तो शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि चपळता वाढवतो, तसेच सांघिक भावना, जलद निर्णयक्षमता आणि धैर्याला प्रोत्साहन देतो. हा खेळ भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असून, तो सामाजिक कौशल्ये सुधारतो आणि तरुण पिढीला त्यांच्या मुळांशी जोडतो. यावेळी त्यांनी स्पर्धेत सहभागी होऊन आपली भारतीय संस्कृती दृढ करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व कबड्डी खेळाडूंचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख अतिथी श्री. काशिनाथ गोगुले यांनी बोलताना असे प्रतिपादन केले की या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच खेळाडूंनी या स्पर्धेदरम्यान चपळता, समय सूचकता,एकाग्रता, सांघिक भावना,विविध बचाव तंत्रांचा वापर करून अनोख्या खेळाचे प्रदर्शन केले. हे सर्व कबड्डी खेळाच्या विकासासाठी व प्रसारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. लेखापाल श्री. प्रतापराव हातोटे यांनी आपल्या मनोगतातून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील खेळासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढे बोलताना ते असे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ अत्यंत आवश्यक आहेत. त्यामुळे तुम्हाला उपलब्ध झालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपल्यातील क्षमतांचा वापर या स्पर्धे दरम्यान केला आहे हे निदर्शनास आले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.सदाशिव सरकटे यांनी असे प्रतिपादन केले की जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातून या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केलेल्या सर्व खेळाडूंचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खरोखरच आपण या स्पर्धेदरम्यान ज्याप्रकारे खेळाचे प्रदर्शन केले ते डोळ्याचे पारणे फेडणारे होते. अशाच प्रकारे आपण उत्तरोत्तर प्रगती करून आपले भविष्य उज्वल करावे. यावेळी त्यांनी विजेत्या संघासह सर्वच खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कदम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपातून असे प्रतिपादन केले की कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्वच संघाची कामगिरी उत्तम होती. हार जीत हा आपल्या मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे जे संघ काही कारणास्तव विजेते होऊ शकले नाहीत त्यांनी निराशा न बाळगता नव्या उमेदीने पुढील स्पर्धेस सामोरे जावे. तुम्हा सर्व खेळाडूंनी आपल्या खेळातून खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केलेले आहे. कोणत्याही प्रकारची आक्रमकता न दाखवता अत्यंत शांत व संयमाने आपण ही क्रीडा स्पर्धा पार पाडलेली आहे त्यामुळे सर्व खेळाडूंचे मनस्वी अभिनंदन करणे अनिवार्य आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. डॉ. बाळासाहेब सरपते तर आभारप्रदर्शन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा डॉ. राणी जाधव यांनी केले.या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी (पुरुष ) स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातून दहा संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेसाठी पंच म्हणून डॉ.बाळासाहेब धोंडे, डॉ खोसे,डॉ.रमेश माने, डॉ.भीमा माने, डॉ. प्रवीण शिलेदार,डॉ. भारत पल्लेवाड डॉ. केतन गायकवाड,डॉ. रवी खरात यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व क्रीडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.



