बीड

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात रक्षाबंधन उत्साहात साजरे, दिव्यांग विद्यार्थिनींनी बांधली भाऊरायाला राखी

श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिरात रक्षाबंधन उत्साहात साजरे,
दिव्यांग विद्यार्थिनींनी बांधली भाऊरायाला राखी

पुणे/आळंदी:-श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्यु. कॉलेज आळंदी देवाची यांच्या संयुक्त विद्यमाने रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रम प्रसंगी सदगुरु हरिहर संस्थानचे ह.भ.प.अजय महाराज जोशी, जैन श्रावक संघ लोणावळा च्या महिला अध्यक्षा संगीता भुरट, प्रवीण इंटरप्राईजेसचे  राजेंद्र सुपेकर, संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, संस्था सदस्य अनिल वडगांवकर, प्रभातचे पत्रकार एम.डी.पाखरे, उद्योजक राजेंद्र नहार, प्राचार्य एस.जी. मुंगसे, मुख्याध्यापक प्रदीप काळे, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
माऊलींच्या मूर्ती पूजनाने व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रदीप काळे यांनी आपल्या प्रास्ताविकांमधून बहिण भावाच्या नात्यांचे महत्त्व सांगत बहिण भावांमधील व कुटुंबातील नाती जपण्याचा संस्कार व्हावा म्हणून रक्षाबंधन व इतर उपक्रम राबविले जातात असे सांगितले.
हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत तिरंग्याची राखी बांधून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्ती दृढ करण्यात आली. प्रशालेतील दिव्यांग विभागाच्या मुलींनी इ. चौथीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या व इतर वर्गातील विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या राख्या विद्यार्थ्यांना बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या मनोगतात परंपरेनुसार गेली २५ वर्ष हा उपक्रम प्रशालेत साजरा केला जातो असे सांगितले तसेच अंध विभागाच्या दिव्यांग मुली त्यांच्या कुटुंबापासून शिक्षणाकरिता दूर राहतात या उपक्रमातून त्यांना राखी बांधण्याची संधी मिळते. आपल्या बहिण भावाच्या नात्यातील प्रेम दिवसेंदिवस वाढत जावो तसेच हा सण कोकणात समुद्राची पुजा करून कोळी बांधव आपल्या व्यवसायाला सुरुवात करतात. हा सण नारळी पौर्णिमा म्हणून साजरा करतात या दिवसाचे महत्त्व सांगत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या.
बहिणींनी भावाला राखी बांधणे ही आपली परंपरा आहे. भावाला बांधलेल्या राखीच्या बंधनाचा भावाने आदर केला पाहिजे असे मत संगीताताई भुरट यांनी व्यक्त केले.
राजेंद्र सुपेकर यांनी समाजातील प्रत्येक मुलीला स्वतःची बहीण मानली जावी म्हणून हा उपक्रम  प्रशालेत साजरा केला जात असल्यामुळे प्रशालेचे कौतुक केले. प्रशालेस व संस्थेस आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
उद्योजक राजू नहार यांनी “येरे येरे भाऊ राया राखी पौर्णिमेला ……” हे गीत गात सर्वांना भावनिक साद घातली.
अजय जोशी यांनी संत ज्ञानेश्वर व मुक्ताई, रावण व शूर्पणखा या भाऊ व बहिणीच्या संबंधाचे पौराणिक दाखले देऊन बहिण ही मुक्ताई सारखी भावाची काळजी करणारी असावी ती शूर्पनखे सारखी चुकीचा सल्ला देणारी नसावी असे सांगत बहिण भावाच्या नात्याला उजाळा दिला असे अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन व आभार वैशाली शेळके यांनी केले. सूत्रसंचालन निशा कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वर्षा काळे, प्रतिभा भालेराव, राहुल चव्हाण, गजानन राठोड, गीतांजली रेवडेकर यांचे सहकार्य लाभले.
पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Back to top button