बीड

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; नगरपालिका अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट; नगरपालिका अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे टळली मोठी दुर्घटना

पुणे / आळंदी (प्रतिनिधी) – दत्त मंदिर रस्त्यावरील हरिपाठ उद्यान समोरील गल्लीमध्ये आज (२८ जुलै २०२५) पहाटे सुमारे ५.३० वाजता, लहु विठ्ठल कोकाटे यांच्या घरात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, किचनमधील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.
घटनेची माहिती उपनगराध्यक्ष सागर बोरूंदिया यांनी तात्काळ आळंदी अग्निशमन विभागास दिली. अल्पावधीतच अग्निशमन दलाचे वाहन घटनास्थळी रवाना झाले, मात्र रस्त्यावरील बेशिस्तपणे पार्क केलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांमुळे अग्निशमन वाहनाला अडथळा निर्माण झाला. तरीही जवानांनी धाडसाने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली.
मोठा अनर्थ टळला
घरात आणखी दोन गॅस सिलेंडर होते, जे जवानांनी तत्काळ बाहेर काढल्यामुळे संभाव्य मोठा स्फोट टळला. आगीने झपाट्याने रौद्ररूप धारण केले होते. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
अतुलनीय कामगिरी करणारे जवान
मुख्याधिकारी माधव खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अग्निशमन दलातील लिडिंग फायरमन प्रसाद बोराटे, फायरमन अमित घुंडरे, सिद्धार्थ गावडे, साहिल काळे आणि वाहनचालक विनायक सोळंकी यांनी धाडसी व तत्परतेने आग आटोक्यात आणली.
पोलीस व नागरिकांचा सहभाग
या घटनेची माहिती मिळताच आळंदी पोलीस ठाण्याचे अधिकारी मच्छिंद्र शेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी हजेरी लावली. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी पुढाकार घेत मोलाचा सहभाग दिला. एक जण जखमी
या दुर्घटनेत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
आधीच सावधगिरी बाळगा
आगीचे नेमके कारण समजले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार गॅस गळतीमुळे स्फोट झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गॅस वापरताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Back to top button