डाळिंबावरील ‘तेल्या’ रोगावर औषध संशोधनाचा बीडच्या प्रयोगशील शेतकर्याचा दावा!

*सोलापूरच्या राष्ट्रीय डाळींब केंद्रांकडून 15 वर्षापासून संशोधनाकडे दुर्लक्ष*
*शेतकर्यांच्या हितासाठी वनश्री सखाराम शिंदे यांची मुख्यमंत्री,कृषीमंत्र्यांना सत्यता पडताळणीचे आवाहन*
बीड (प्रतिनिधी):- बीड तालुक्यातील शिवणी येथील प्रयोगशील शेतकरी तथा सन 1992 मध्ये महाराष्ट्र शासनाचा ‘वनश्री’ पुरस्कार प्राप्त शेतकरी सखाराम शिंदे यांनी डाळिंबावरील ‘तेल्या’ या रोगावर स्वत:च्या अनुभवातून वनस्पतीपासून संशोधन करत जैविक औषध तयार केल्याचा दावा केला आहे. ते औषध राज्यभरातील विविध डाळिंब उत्पादक शेतकर्यांना त्यांच्या बागेत डाळिंबावर योग्य प्रमाणात फवारणीसाठी दिले. अन् या शेतकर्यांच्या डाळिंबांवरील ‘तेल्या’ रोगाचा नायनाट झाला. त्यानंतर या औषधाला राज्य व केंद्र सरकारकडून परवानगी मिळावी म्हणून सखाराम शिंदे यांनी त्यांनी तयार केलेले औषध सत्यता पडताळणीसाठी प्रयोगशाळेत तपासणी व्हावी म्हणून राष्ट्रीय डाळीब संशोधन,केंद्र शेळगी,(सोलापूर) येथे सन 2010 पासून आजपर्यंत 4 वेळेस पाठवून दिले. डाळींबावरील ‘तेल्या’ या रोगाच्या तेलकट डागावरील आयुर्वेदीक (जैविक) औषधाची परवानगी मिळावी म्हणून पत्रव्यवहार केले.मात्र मागील 15 वर्षात या संशोधन केंद्रांकडून आपल्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले गेले असून आता शेतकर्यांच्या हितासाठी केंद्रीय कृषीमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांनी माझ्या औषधाची सत्यता पडताळावी असे निवेदन देणार असल्याचे शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.
याबाबत माहिती देताना वनश्री सखाराम शिंदे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी बीड तालुक्याती शिवणी येथील राहिवासी आहे. सन 1998 पासून मी शेतीमध्ये विवध प्रयोग केले आहेत व करत आहे. 1997 मध्ये ‘आरक्ता’ जातीची डाळिबांची एक हजार झाडे माझ्या शेतात लावली होती, त्यानंतर सन 2002 मध्ये भगाव जातीच्या डाळिंबाची 500 झाडे लावली; मात्र त्या दोन्ही पिकांवर तेल्या रोग आला, त्यामुळे या दोन्ही डाळिंबाच्या बागा नष्ट कराव्या लागल्या. त्यानंतर 2007 मध्ये पुन्हा 300 डाळिबांची झाडे लावली परंतु त्याच्यावर सुध्दा ‘तेल्या’ रोग आला पडला. सततच्या या रोगामुळे मी चक्रावून गेलो होतो. असे असतानाच एका वनस्पतीच्या अर्काने तेल्या रोगाचा बॅक्टेरिया व बुरशी नाहीशी होई, असे माझ्या वाचनात आले होते, त्यानंतर मी माझ्या व माझ्या व माझ्या मित्राच्या बागेत ते औषध फवारणी केली त्यामुळे तेल्या रोगग्रस्त बागेत तेल्या रोग नाहीसा झाला. या औषधाचा सर्व डाळिंब उत्पादक शेतकर्यांना फायदा व्हावा या उद्देशाने मी माझे औषध सन 2010 मध्ये राष्ट्रीय डाळीब संशोधन,केंद्र शेळगी,(सोलापूर) येथे तपासणीसाठी दिले. ते एक लीटर पाण्यात 10 मि.ली. औषध टाकावे. आठ दिवसाला औषध फवाराी करावी नंतर येणारे फुले, पान हे तेल्या रोगमुक्त असतील, असा विश्वास मी त्यांना औषधाची मला परवानगी द्यावी अशी मागणी केली मात्र मागील 15 वर्षात या संशोधन केंद्रांती शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप सखाराम शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे आता शेतकर्यांच्या हितासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषीमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे यांनी त्यांनी ज्या शेतकर्यांना डाळिंब बागेत फवारणीसाठी औषध दिले व तिथे ‘तेल्या’ रोग नाहीसा झाला, त्या शेतकर्यांचे नाव, गाव व मोबाईल क्रमांकही सोबत जोडले आहेत.
*चौकट*
….तर देशभरातील डाळिंब उत्पादकांना होईल फायदा
शेतपिकांवरील फळबागांवरील रोग जसे निसर्गात तयार होतात तसेच त्याचे औषधही निसर्गातच तयार करता येते हा माझा अभ्यास होता. डाळींब संशोधन केंद्र एकमेव सोलापूरला आहे. शेतकरीही शास्त्रज्ञ होवू शकतो हा मला विश्वास होता, लाल्या रोगामुळे महाराष्ट्र आणि देशातील डाळींब उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडत असतात. मात्र मी तयार केलेले औषध संशोधनाअंती सिध्द झाले तर अनेक शेतकर्यांना त्याचा लाभ होईल अशी माझी प्रांजळ भावना आहे अशी प्रतिक्रिया प्रयोगशील शेतकरी सखाराम शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
*चौकट*
औषधाची प्रयोगशाळेत सत्यता पडताळावी!
भारत कृषी प्रधान देश असून भारत शेतीवरच जगतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना माझे आवाहन आहे की, मी तयार केलेले लाल्या रोगावरील औषध आपण आपल्या राज्य शासनाच्या प्रयोगशाळेत ते इतर काही शेतकर्यांना डाळींबावर फवारण्यासाठी द्यावे. त्याचे रिझल्ट काय येतात, त्या औषधाची सतत्या नेमकी पडताळून पहावी. डाळींब संशोधन केंद्राच्या ‘लॅब’मध्ये या औषधाची तपासणी करुन त्याचे खरे रिझल्ट शेतकर्यांसमोर येवू द्यावेत असे आवाहनही शेतकरी सखाराम शिंदे यांनी केले आहे.


