बीड

सुरेश माने यांच्या आक्रमक भूमिकेनंतर दिव्यांगाच्या अनुदानात १ हजार रूपये वाढ

सुरेश माने यांच्या आक्रमक भूमिकेनंतर दिव्यांगाच्या अनुदानात १ हजार रूपये वाढ
आता दिव्यांग लाभार्थींना मिळणार २ हजार ५०० रूपये प्रति महिना अनुदान
प्रतिनिधी | बीड:-राज्यातील दिव्यांग बांधवांच्या न्याय्य हक्कांसाठी रिपब्लिकन पक्ष ऑफ इंडिया (आठवले गट) दिव्यांग आघाडीने आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सरकारकडे दिव्यांगांच्या प्रमुख ८ मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यापैकी संजय गांधी व श्रावण बाळ पेन्शन योजनेंतर्गत मिळणारे १ हजार ५०० रुपये अनुदान वाढवून किमान ३ ते ४ हजार रुपये प्रति महिना करावा अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत आत लाभार्थींना प्रति महिना २ हजार ५०० रूपये मिळणार आहेत.
 प्रदेशाध्यक्ष सुरेश धर्मराज माने यांनी याच बरोबर इतर लाभार्थ्यांप्रमाणे दिव्यांग बांधवांना देखील घरकुलांसाठी कोणत्याही अटी-शर्तीशिवाय तात्काळ लाभ मिळावा, दिव्यांग बांधवांसाठी व्यवसायासाठी दिले जाणारे बीज भांडवल १.५० लाखांवरून वाढवून ३ लाख रुपये करावे, सर्व बँकांकडून विना अट विना हमी व्यवसायासाठी कर्ज मिळावे, अशा महत्त्वाच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्या अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्याचप्रमाणे २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या ५ टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करणे बंधनकारक असताना त्याची अंमलबजावणी होत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधलेले आहे.
——
इतर मागण्यांसाठी पाठपुरावा सुरूच राहणार – प्रदेशाध्यक्ष सुरेश माने
आमच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर पुढील काळात व्यापक आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल. असा आम्ही इशारा शासनाला दिला होता. याची दखल घेऊन शासनाने ” दिव्यांग बांधवांच्या अनुदानात वाढ केली. त्याबद्दल शासनाचे आभार मात्र इतर मागण्याही केवळ सहानुभूतीच्या दृष्टिकोनातून नव्हे तर हक्काच्या भूमिकेतून मान्य कराव्यात, आणि आमच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील असे प्रदेशाध्यक्ष सुरेश माने यांनी यांनी म्हटले आहे.
Back to top button