ग्रामीण विकास संस्थेला न्यायाधीश सत्यवान डोके यांची सदिच्छा भेट

ग्रामीण विकास संस्थेला न्यायाधीश सत्यवान डोके यांची सदिच्छा भेट
संविधानच सर्वश्रेष्ठ – जिल्हा न्यायाधीश सत्यवान डोके
न्यायाधीशांकडून ॲड डॉ अरुण जाधव यांच्या कार्याचे कौतुक
जामखेड प्रतिनिधी – ९३ देशांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी संविधान लिहिले. संसद मोठी की सर्वोच्च न्यायालय, यावर वाद असतो. मात्र, संविधानच सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन अमरावती जिल्हा न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश सत्यवान डोके यांनी केले.
ते जामखेड येथील ग्रामीण विकास केंद्र संस्थेला भेट देत असताना आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापूसाहेब ओव्हळ, उमा जाधव, ॲड. हर्षल डोके, सचिन भिंगारदिवे, रेश्मा बागवान, ललिता पवार, ऋषिकेश गायकवाड, राजु शिंदे, लता सावंत, निता इंगळे, सुनिता बनकर, यास्मिन बागवान, शहानूर काळे आदी मान्यवर व संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. अरुण जाधव यांनी गेली ३० वर्षे सामाजिक क्षेत्रात सातत्याने केलेले काम कौतुकास्पद आहे. मी गेली २४ वर्षे गावापासून दूर आहे, मात्र माझे नाव गावाशी जोडले गेले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मी त्यांचे कार्य नियमितपणे पाहतो,असेही डोके यांनी सांगितले.
सत्कार कार्यक्रम प्रसंगी “आम्ही घडलो” या पुस्तकाच्या प्रती व पुष्पगुच्छ देऊन न्यायमूर्ती डोके यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थाध्यक्ष ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी केली, तर आभार प्रदर्शन बापूसाहेब ओव्हळ यांनी मानले.



