बीड

दोन महिन्यापासून काटकर वस्ती येथे तीव्र पाणीटंचाई ; जामखेड नगर परिषदेचे दुर्लक्ष

दोन महिन्यापासून काटकर वस्ती येथे तीव्र पाणीटंचाई ; जामखेड नगर परिषदेचे दुर्लक्ष

जामखेड (प्रतिनिधी) – शहरातील काटकर वस्तीमध्ये २ महिन्यांपासून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वस्तीतील महिलांपासून वृद्धांपर्यंत सर्वच वर्ग त्रस्त असून, या प्रश्नांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांनी यापूर्वी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही कोणत्याही संबंधित कर्मचाऱ्याने घटनास्थळी येऊन पाहणी केली नाही. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्यामुळे जामखेड नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे थेट लेखी अर्जाद्वारे निवेदन दिले आहे.नागरिकांनी आता 20 दिवसापूर्वी निवेदन देऊनही याची दखल घेतली गेली नाही
नगरपरिषदचे कर्मचारी वेळेवर कर वसुली करण्यासाठी तगादा लावतात.मात्र नागरिकांना असणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी वर्ग व कर्मचारी उडवा उडवी ची उत्तरे देतात अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, वस्तीमध्ये फारच कमी प्रमाणात पाणी येते किंवा अनेकवेळा पूर्णतः बंद असते. यामुळे घरगुती उपयोगासाठी पाणी मिळणे कठीण झाले आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
प्रशासनाकडून वेळेवर कारवाई होत नसल्यानं आम्हाला खाजगी पाणी टँकर विकत घ्यावे लागत आहेत. ज्याचा आर्थिक बोजा सामान्य कुटुंबांवर पडतो,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.
या अर्जात नगरपरिषदेला विनंती करण्यात आली आहे की, काटकर वस्तीतील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा व भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी.
दरम्यान, या विषयावर जामखेड नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा अधिकारी मिसाळ दुरध्वनी संपर्क केला असता प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. मात्र, जर लवकरच समाधानकारक तोडगा निघाला नाही, तर काटकर वस्ती रहिवाशी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनावर बाळासाहेब यादव सुभाष माळी,विजू गदादे ,मंगल काटकर, मंदाबाई काटकर, विष्णू गीते, सुरेश शिंदे, गोविंद शिंदे,संतोष राऊत, आकाश विधाते, ऋषिकेश कुंजीर, बाळासाहेब अनारसे, भागवत पवार, नितीन राऊत, हरिभाऊ पठाडे, शांताराम शिंदे, भगवान नागरगोजे, अशोक नागरगोजे आदींच्या सह्या आहेत.

Back to top button