
संजय काशिद यांची जामखेड शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती
शिवसेनेपासून शहर मंडलध्यक्ष पदापर्यंतचा प्रवास ; संजय काशिद ठरले केंद्रबिंदू
जामखेड (प्रतिनिधी) | जामखेड शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, अनुभवी सामाजिक कार्यकर्ते संजय काशिद यांची जामखेड शहर मंडल अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, पक्ष कार्यकर्त्यांमध्येही नवचैतन्य निर्माण झाले आहे.
संजय काशिद यांचा राजकीय आणि सामाजिक कार्यातील अनुभव मोठा आहे. त्यांनी यापूर्वी शिवसेना उबाठा शहरप्रमुख १ वर्ष व तालुकाप्रमुख म्हणून ५ वर्ष काम पाहिले आहे.त्यानंतर त्यांनी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती मिळवली. त्यांनी सामाजिक कार्यातही सक्रिय सहभाग नोंदवला.
राजकीय क्षेत्रातील योगदानाबरोबरच संजय काशिद हे सामाजिक कार्यातही तेवढेच आघाडीवर राहिले आहेत. जगदंब प्रतिष्ठान या त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी आरोग्य शिबिरे, गरीब व विद्यार्थ्यांसाठी मदतीचे उपक्रम, वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे, कोरोना काळात भाजीपाला, मास्क सॅनिटायझर तसेच अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप केले.अशा अनेक उपक्रम राबवले आहेत. त्यामुळे त्यांच्या सामाजिक बांधिलकीची दखल विविध स्तरांवर घेतली गेली आहे.
शहर मंडल अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संजय काशिद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले, “शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करणे, प्रथम देश, नंतर पक्ष शेवटी स्वतःही ध्येय धोरणे तळागाळात राबवणार हेच माझे प्रमुख उद्दिष्ट राहणार आहे. पक्षाने दाखवलेला विश्वास मी कामाच्या माध्यमातून सार्थ ठरवेन.”



