बीड
झाडावरच टोमॅटो पिकुन गळु लागले ; भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघेना ; मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांची खंत :- डॉ.गणेश ढवळे

झाडावरच टोमॅटो पिकुन गळु लागले ; भाव नसल्याने उत्पादन खर्चही निघेना ; मुळुकवाडी येथील शेतकरी अशोक ढास यांची खंत :- डॉ.गणेश ढवळे
—–
लिंबागणेश:- ( दि.१३ ) उन्हाची तिव्रता वाढल्याने टोमॅटो पिकाला याची झळ बसल्याने झाडावरच टोमॅटो पिकुन गळु लागले आहेत. टोमॅटोचे दर घसरले असुन यातुन शेतातील खत, बियाणे, मजूरी याचा प्रचंड खर्च असुन टोमॅटो अवघ्या ५ ते १० रूपये किलो दराने विकावे लागत असुन उत्पादन खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाल्याचे बोलले जाते. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाला असुन विक्रीला परवडत नसल्याने झाडावरच पिकुन गळत असल्याचे सांगत टोमॅटो बरोबरच कष्टही मातीमोल ठरल्याची उद्विग्न प्रतिक्रिया मुळुकवाडी येथील टोमॅटो उत्पादक शेतकरी अशोक मल्हारी ढास यांनी डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्याशी बोलताना दिली.
टोमॅटो बरोबरच कष्टही मातीमोल ; उत्पादन खर्चापेक्षा मिळतोय कमी भाव :- अशोक ढास ( टोमॅटो उत्पादक शेतकरी मुळुकवाडी ता.जि.बीड)
—
गेल्या वर्षी टोमॅटोला जवळपास १०० रूपये किलो भाव मिळाला होता. म्हणून टोमॅटोची लागवड केली. एकरी सव्वा लाख रुपयांपर्यंत खर्च आला. टोमॅटोचे पिक सुद्धा चांगले आले आहे.मात्र भाव नसल्यामुळे टोमॅटो विक्रीसाठी काढायला सुद्धा परवडत नाही. १०० रूपये कॅरेट भाव असुन चाकण,पुणे, नारायणगाव याठिकाणी विक्री साठी पाठवतोत.पण कॅरेट मागे वाहतुक खर्च ६० रूपये, टोमॅटो तोडण्यासाठी महिला मजूर ३०० रूपये रोज तसेच आडत, कमिशन आदी मिळुन ८०-९० रुपये खर्च येतो. म्हणून टोमॅटोची झाडावरच पिकुन गळती होत आहे. चांगला भाव मिळाला असता तर दैना फिटली असती परंतु आपलं नशीब फुटकं म्हणून सहन करायचं अशी मनातली सल अशोक ढास यांनी बोलून दाखवली



