बीड
होळमध्ये भगवान बाबा वारकरी संस्थेचा पाया मधुकर महाराज खाडे यांनी रचला

होळमध्ये भगवान बाबा वारकरी संस्थेचा
पाया मधुकर महाराज खाडे यांनी रचला
ह.भ.प.महादेव महाराज बोराडे यांचे प्रतिपादन; होळ येथे किर्तन सोहळा
प्रतिनिधी ;-दि.१५ : मधुकर महाराज खाडे यांचे कार्य राजकीय क्षेत्र, कुस्तीसोबत वारकऱ्यांच्या आखाड्यातही होते. त्यांनी अनेक वारकरी, पैलवान घडवले असून होळ येथील भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचा पाया रचला. त्यांच्यामुळे परिसरातही वारकरी संस्था निर्माण झाल्या, त्यांचा आग्रह नसता तर संस्था उभ्या राहिल्या नसत्या. संस्थापक सचिव असूनही त्यांनी एखाद्या सेवेकऱ्याप्रमाणे आयुष्यभर सेवा केली, असे प्रतिपादन औरंगपूर (ता.केज) येथील श्री.जगद्गुरु तुकोबाराय पावनधाम संस्थानचे महंत ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी व्यक्त केले.
वै.पै.मधुकर महाराज खाडे यांचे दि.६ फेब्रुवारी रोजी अपघाती निधन झाले. त्यानिमित्ताने केज तालुक्यातील होळ येथील श्री संत भगवान बाबा मंदिरात दि.१३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान किर्तन सप्ताह आयोजित केला आहे. ह.भ.प. महादेव महाराज बोराडे शास्त्री हे शनिवारी (दि.१४) किर्तन सेवेप्रसंगी बोलत होते. यावेळी होळ येथील संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.डॉ.प्रल्हाद महाराज ढाकणे शास्त्री, पुणे येथील संगीत क्षेत्रातील विद्यावाचस्पती ह.भ.प.प्रा. गणेश महाराज भगत, पावनधाम संस्थानचे सचिव ह.भ.प.अमोल महाराज जाधव, ह.भ.प.विष्णू महाराज गुळभिले, मृदंगाचार्य राम महाराज निकम, गायनाचार्य हर्षद महाराज दसवडकर यांची उपस्थिती होती.
महादेव महाराज बोराडे यांनी किर्तन सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा देह तंव असे भोगाचे अधीन । याचे सुख सीण क्षणभंगुर ॥१॥ अविनाश जोडी देवापायी भाव । कल्याणाचा ठाव सकळही ॥ध्रु.॥ क्षणभंगुर हा तेथील पसारा । आलिया हाकारा अवघे नासे ॥२॥ तुका म्हणे येथे सकळ विश्रांति । आठवावा चित्ती नारायण ॥३॥ हा अभंग घेतला होता. बोराडे महाराज म्हणाले, संत तुकाराम महाराज यांनी उपदेश दिला आहे. त्यांनी म्हटले की, शब्दाची किमया महत्वाची नसते, शब्द कुणाच्या मुखातून निघतो याला अनन्यसाधारण महत्व असते. शब्दामध्ये सामर्थ्य आहे, त्यांचाच उपदेश ऐकावा. समाजाला दिशा दाखविण्यासाठी देवाने संतांना पाठवले. देह हा दुर्लभ आहे. देहाचे सामर्थ्य कळले तो व्यक्ती समर्थ होतो. व्यक्तीकडे अल्पवेळ आहे, मात्र वेळ भरवशाचा नाही. कधीकधी घास मुखात जाईल, इतका श्वास मिळत नाही. हा देह नश्वर आहे, हा विचार आचरणात आणून खाडे महाराजांनी अहोरात्र सेवा केली, असे सांगून श्रद्धांजली अर्पण केली. माणूस जिवंत असताना किंमत कळत नाही हे आपले दुर्दैव आहे. समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी म्हटल्याप्रमाणे मोठे होण्यासाठी मरावे लागते. अगदी तसेच वै.पै.मधुकर महाराज खाडे हे न कळलेले आणि अजातशत्रू व्यक्तीमत्व होते. त्यांचा राग-लोभ विसरून पुढे जाण्याचा गुण अनुकरणीय आहे. पावनधाम संस्थानवर त्यांचे येणे विशेष होते. गतवर्षीच्या आयोजित धोंडे जेवण समारंभात नामवंत किर्तनकारांमध्ये खाडे महाराजांचा संस्थानकडून सन्मान केला, याचा मनस्वी आनंद आहे, असे बोराडे महाराज यांनी म्हटले. यावेळी ग्रामस्थ, होळ येथील संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था, औरंगपूर येथील पावनधाम संस्थानचे पदाधिकारी, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
किसन महाराज पवार यांचे आज किर्तन
अंबाजोगाई येथील मुकुंदराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. किसन महाराज पवार यांचे होळ येथे आज (दि.१७) किर्तन होणार आहे. या किर्तनास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



