बीड
घाटसावळी, नाळवंडी, शिवणी, नाथापुर सबस्टेशनमधून कमी दाबाने वीजपुरवठा, ६० + गावचे शेतकरी त्रस्त – धनंजय गुंदेकर

घाटसावळी, नाळवंडी, शिवणी, नाथापुर सबस्टेशनमधून कमी दाबाने वीजपुरवठा, ६० + गावचे शेतकरी त्रस्त – धनंजय गुंदेकर
कुणीही लोकप्रतिनिधी आवाज उठवत नसल्याने हा जाणीवपूर्वक अन्याय, लवकरच तीव्र आंदोलन
बीड (प्रतिनिधी) ;- तालुक्यातील 220 केव्ही बीड उपकेंद्रातून निघणारी 33 केव्ही वीज वाहिनी सध्या प्रचंड ओव्हरलोड झाली आहे. सध्या रब्बी पिकांचा भरणा चालू असताना ६० पेक्षा अधिक गावचे शेतकरी या अडचणमुळे त्रस्त झाले आहेत. सदर 33 केव्ही लाईनवर मोठ्या प्रमाणात भार असून, पाच सबस्टेशन्स (33/11 केव्ही शिवणी, नाळवंडी, घाटसावळी, खडकी देवळा, नाथापूर) आणि 6 औद्योगिक कंपन्या जोडलेल्या आहेत. त्यामुळे या लाईनवर अत्याधिक ताण येऊन वारंवार ट्रिपिंग, कमी दाबाचा (लो व्होल्टेज) वीजपुरवठा तसेच अनियमितता यांसारख्या गंभीर समस्या निर्माण झाल्या असल्याचे संचालक धनंजय गुंदेकर यांनी म्हंटले आहे.
याबाबत कुणीही आवाज उठवत नसल्याने महावितरण कडून दुर्लक्ष होत असून आठवडाभर झाले शेतकरी, नागरिक यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शेती पंपांना योग्य दाबाने वीज मिळत नसल्यामुळे सिंचनावर विपरीत परिणाम होत आहे. पिके कोमेजून जात असून घरगुती वीज वापर देखील प्रभावित झालेला आहे. याच भागात विद्युत पुरवठा बाबत सातत्याने अन्याय होतो, या सब स्टेशन मधील समस्यांसाठी कोणताच लोकप्रतिनिधी पुढे येत नसल्याने येथील शेतकरी, ग्रामस्थांना विजेच्या बाबतीत नाहक समस्यांचा सामना करावा लागत असून याकडे महावितरण कंपनी प्रशासन सातत्याने दुर्लक्ष करते आहे म्हणून येत्या २ दिवसांत शेतकऱ्यांच्या बैठका घेत तीव्र आंदोलन उभा करण्यात येणार असल्याचा इशारा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय गुंदेकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिला आहे.



