📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवा; गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर चमकण्याची संधी निर्माण करा – जयदत्त क्षीरसागर

तळागाळातील विद्यार्थ्यांना घडवा; गुणवत्तेच्या बळावर जागतिक स्तरावर चमकण्याची संधी निर्माण करा – जयदत्त क्षीरसागर

शिरूर कासार दि.13(प्रतिनिधी):- शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आजच्या स्पर्धात्मक युगात गुणवत्तेला जागतिक स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देऊन चालणार नाही, तर संशोधन, सांस्कृतिक क्षेत्र आणि क्रीडा क्षेत्रातही त्यांना प्राविण्य मिळविण्यासाठी सक्षम करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

शिरूर कासार येथील कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी खा.स्व.केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतिदालनाचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी  माजी सभापती सतीश काटे, सुधाकर मिसाळ, बाबुराव केदार, सुभाष क्षीरसागर, शरद ढाकणे, गहिनीनाथ पाखरे, सुलेमान पठाण, गोविंद पाटील गाडेकर, कलंदर पठाण, आजिनाथ गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना क्षीरसागर म्हणाले की, आपल्या काळात शैक्षणिक वातावरण आजच्या तुलनेत फारसे प्रभावी आणि परिणामकारक नव्हते. मात्र, अलीकडच्या काळात शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने बदल होत आहेत. या बदलत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी स्वतःला अद्ययावत ठेवून ज्ञान, कौशल्य आणि गुणवत्तेच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली पाहिजे. संधी निर्माण करण्याची ताकद गुणवत्तेत असते. केवळ इतरांच्या आधारावर प्रगती करता येत नाही; स्वतःच्या क्षमतेवर उभे राहण्याची वृत्ती विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली पाहिजे. शासनाने निर्माण केलेल्या विकासाच्या संधी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांना प्रगतीच्या समान संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शिक्षण क्षेत्रासमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या बदलांकडे केवळ आव्हान म्हणून न पाहता त्यांचा योग्य वापर करून विद्यार्थ्यांची ज्ञानक्षमता आणि संशोधनवृत्ती विकसित केली पाहिजे. देशाच्या प्रगतीत पारंपरिक 10+2+3+2 शैक्षणिक रचनेचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. त्याचबरोबर नवीन शैक्षणिक धोरणातून होत असलेले बदलही भावी पिढीच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. या परिवर्तनातून देशाच्या शैक्षणिक भविष्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग तसेच आविष्कार’ संशोधन उपक्रमांतर्गत विविध स्तरांवर प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे, मुख्याध्यापक केशव भांगे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button