विजयाची हॅट्रिक; ‘बीडचा राजा’ची सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकावर मोहोर

आदियोगीच्या भव्य देखाव्याची भुरळ; प्रोजेक्शन मॅपिंग व लेझर शो ठरले यंदाच्या सादरीकरणाचे आकर्षण
बीड : कल्पतरू प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव देखावे स्पर्धेत ‘बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळा’ने सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावत विजयाची हॅट्रिक साधली. यंदा मंडळाने आदियोगीच्या भव्य प्रतिमेवर अत्याधुनिक प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर शो, प्रकाश व ध्वनी यांच्या प्रभावी संयोजनातून साकारलेला देखावा सादर केला होता. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साकारलेल्या या देखाव्याने बीडकरांसह जिल्हाभरातील गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले. गणेशोत्सवाच्या कालावधीत हजारो भाविकांनी देखाव्याला भेट देत या अभिनव सादरीकरणाचा अनुभव घेतला.
आदियोगीच्या भव्य प्रतिमेला केंद्रस्थानी ठेवून साकारलेल्या देखाव्यात प्रोजेक्शन मॅपिंगच्या माध्यमातून विविध दृश्यांची मांडणी करण्यात आली होती. प्रतिमेवर साकारलेली दृश्ये, लेझर किरणांची आकर्षक प्रकाशरचना आणि ध्वनी-प्रकाशाचा समन्वय यामुळे भाविकांना वेगळा दृश्यानुभव मिळाला. धार्मिक आणि सांस्कृतिक आशयाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत सादर केलेल्या या देखाव्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या यशाला बीड शहरातील गणेशोत्सवाच्या दृष्टीने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. काही वर्षांपूर्वी शहरातील गणेशोत्सवातील देखाव्यांची प्रथा जवळपास बंद पडली होती. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक विषय प्रभावीपणे मांडण्याची ही परंपरा पुन्हा सुरू करण्यासाठी ‘बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळा’ने पुढाकार घेतला. मंडळाचे मुख्य मार्गदर्शक श्री. गिरीशजी गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा वर्षांपासून विविध संकल्पना, भव्य सादरीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखावे साकारण्याचे काम सातत्याने सुरू आहे. या प्रयत्नांना हळूहळू बीडकरांचा प्रतिसाद मिळत गेला आणि यंदाच्या गणेशोत्सवात त्याचे व्यापक स्वरूप पाहायला मिळाले.
‘बीडचा राजा’च्या या उपक्रमामुळे शहरातील इतर गणेश मंडळांनाही देखावे सादर करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले. यंदा विविध मंडळांनी नवनवीन संकल्पना आणि आकर्षक सादरीकरणाच्या माध्यमातून देखावे उभारले. त्यामुळे काही काळ खंडित झालेली बीड शहरातील गणेशोत्सवातील देखाव्यांची परंपरा पुन्हा सुरू होण्यास चालना मिळाली. शहरातील गणेशोत्सवात देखाव्यांच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण विषय मांडण्याची चळवळ पुन्हा सुरू होणे, ही या उपक्रमाची महत्त्वाची फलश्रुती मानली जात आहे.
कल्पतरू प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित देखावे स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार वितरण सोहळ्यात मंत्री पंकजाताई मुंडे, माजी खासदार प्रीतमताई मुंडे, युवा नेते अक्षयभैय्या मुंदडा, युवा नेते आदित्यभैय्या सारडा, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकररावजी देशमुख साहेब, कल्पतरू प्रतिष्ठानचे युवा नेते योगेशभैय्या क्षीरसागर आणि नगरसेविका सारिकाताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते ‘बीडचा राजा न्यू गणेश मित्र मंडळा’ला प्रदान करण्यात आला.
यंदाचा देखावा साकारण्यासाठी मंडळाच्या वतीने अनेक दिवसांपासून नियोजन करण्यात आले होते. आदियोगीची भव्य प्रतिमा, प्रोजेक्शन मॅपिंग, लेझर शो, प्रकाशयोजना आणि ध्वनीव्यवस्था यांची तांत्रिक सांगड घालत प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. संकल्पनेपासून उभारणीपर्यंतच्या या संपूर्ण प्रक्रियेत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. मंडळाचे मुख्य मार्गदर्शक श्री. गिरीशजी गिलडा, नियोजक प्रीतम गिलडा, कार्यकारिणी अध्यक्ष कृष्णा मुंदडा, अध्यक्ष गौरव शर्मा, उपाध्यक्ष पुष्कर मुंदडा, सचिव मोरे, कोषाध्यक्ष दत्ता घेवारे यांच्यासह मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या उपक्रमासाठी योगदान दिले.
सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बीडकरांचे आभार मानले. या पुरस्काराचे श्रेय मंडळाच्या कार्यकर्त्यांसह देणगीदार, मार्गदर्शक आणि देखाव्याला भेट देऊन प्रतिसाद देणाऱ्या नागरिकांना देण्यात आले. बीडकरांचे प्रेम आणि विश्वास यामुळेच नवीन संकल्पना राबविण्यास प्रेरणा मिळत असल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले. आगामी काळातही गणेशोत्सवाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण संकल्पना आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार देखावे सादर करण्याचा प्रयत्न कायम ठेवण्यात येणार आहे.



