📰 Epaper Read Now →
📰 Epaper Read Now →
बीड

चिचाळ तलावाजवळ कथित अवैध साठ्याने खळबळ; महसूल विभागाच्या कारवाईकडे नजर

चिचाळ तलावाजवळ कथित अवैध साठ्याने खळबळ; महसूल विभागाच्या कारवाईकडे नजर

दै, सूर्योदय:- प्रतिनिधी
लाखांदूर :- चिचाळ तलावाजवळ मोठ्या प्रमाणात साचविण्यात आलेल्या कथित अवैध रेतीसाठ्याने परिसरात खळबळ उडाली असून, “हा साठा नेमका कुणाचा?” हा सवाल आता थेट प्रशासनाच्या दारात पोहोचला आहे. रेती कुठून आली, कोणी आणली, कोणाच्या परवानगीने साठवली आणि या संपूर्ण व्यवहाराची महसूल विभागाला माहिती आहे का, असे सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहेत. परिसरातील नदीपात्र अथवा अन्य स्रोतांमधून रेतीची वाहतूक करून तलावाजवळ साठवणूक करण्यात आल्याची चर्चा असून, यामागील सत्य बाहेर आणण्यासाठी महसूल प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पंचनामा करणे गरजेचे आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा उघड्यावर पडलेला असताना संबंधित यंत्रणेचे याकडे लक्ष गेले नाही का, असा संतप्त सवालही नागरिकांमधून केला जात आहे. साठा अधिकृत असेल तर परवानगी कुठली? आणि अनधिकृत असेल तर कारवाई कुठे? या दोन प्रश्नांची उत्तरे आता महसूल विभागाने जनतेसमोर देणे आवश्यक आहे. कथित अवैध उत्खनन, वाहतूक किंवा साठवणुकीमुळे शासनाच्या महसुलाचे नुकसान होत असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे रेतीचा स्रोत, साठ्याचे प्रमाण, मालकी, वाहतूक परवाने व संबंधित कागदपत्रांची सखोल तपासणी करून दोष आढळल्यास रेतीसाठा जप्त करावा आणि नियमानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. चिचाळ तलावाजवळचा हा रेतीचा डोंगर केवळ रेतीचा साठा आहे की महसुलाला लागलेली वाळवी, याचा छडा आता प्रशासनानेच लावायचा आहे! वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि कारवाईचा अहवाल जनतेसमोर जाहीर करावा, अशी मागणी होत असून, महसूल प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
Back to top button