बीड

वडवली येथे ५ जुलै रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

वडवली येथे ५ जुलै रोजी भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
​खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन; पनवेलच्या प्रसिद्ध शंकरा आय हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार
​श्रीवर्धन (संदेश घोलप ):
लोकप्रिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, दिनांक ५ जुलै २०२६ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे भव्य मोफत डोळे तपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्रीवर्धन) आणि ग्रुप ग्रामपंचायत वडवली यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, वडवली येथील ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांची तपासणी केली जाईल.
​या शिबिरामध्ये अत्याधुनिक कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची तपासणी करून अत्यंत माफक दरात नंबरचे चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय, महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत पात्र असणाऱ्या सर्व रुग्णांवर मोफत नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येईल. तसेच सर्व प्रमुख कंपन्यांच्या ‘मेडिकलेम’ अंतर्गत कॅशलेस सुविधेचा लाभही रुग्णांना घेता येणार आहे.
​या आजारांवर होणार मोफत उपचार व शस्त्रक्रिया:
​शिबिरात केवळ प्राथमिक तपासणीच नव्हे, तर डोळ्यांच्या विविध गंभीर आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. यामध्ये प्रामुख्याने:
​पडद्याच्या सर्व शस्त्रक्रिया (पडदा निसटणे)
​मधुमेह (डायबेटीस) मुळे डोळ्यांच्या पडद्याला झालेल्या दोषांवरील शस्त्रक्रिया
​पडद्याची सूज कमी करण्यासाठी लागणारे ‘एव्हास्टिन’ इंजेक्शन
​डायबेटीस रेटिनापॅथीसाठी ग्रीन लेझर शस्त्रक्रिया
​लासरू शस्त्रक्रिया (DCR, DCT), तिरळेपणा आणि बुबुळ बदलणे यांसारख्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांचा समावेश आहे.
​रुग्णांची संपूर्ण सोय मोफत:
​मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी संस्थेमार्फत ‘शंकरा नेत्रालय, पनवेल’ येथे नेण्यात येणार आहे. ऑपरेशनसाठी जाणाऱ्या सर्व रुग्णांची लॅब टेस्टिंग, औषधोपचार, येण्या-जाण्याची वाहतूक व्यवस्था, राहणे आणि जेवणाची सोय आयोजकांकडून पूर्णपणे मोफत केली जाईल. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना काळे गॉगलही मोफत दिले जाणार आहेत.
​स्थानिक नेतृत्वाचा पुढाकार:
​या समाजोपयोगी उपक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीवर्धन सभापती सुचिन किर, तालुकाध्यक्ष मंदार तोडणकर, तालुका युवा अध्यक्ष किरण दामोदर कांदेकर, तालुका महिला अध्यक्षा सौ. सबा शब्बीर फिरफिरे, आणि जिल्हा परिषद सदस्या श्रीमती वासंती मंगेश गुणाजी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ग्रुप ग्रामपंचायत वडवलीचे सर्व सदस्य व कर्मचारी वर्ग परिश्रम घेत आहेत.
​नाव नोंदणी व संपर्क:
परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संतोष भायदे (९४०४५८६९११) किंवा हेमंत किर (९६०४८२२१२२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Back to top button