बीड
स्व.अजित स्मृती व्याख्यानमालेत बीड जिल्हा शिवसेनेचे अभिवादन

स्व.अजित स्मृती व्याख्यानमालेत बीड जिल्हा शिवसेनेचे अभिवादन
बीड(प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात येत असलेल्या स्व.अजित स्मृती व्याख्यानमालेच्या पाचव्या कार्यक्रमात बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्व.दादांना अभिवादन करण्यात आले. जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप आणि जिल्हाप्रमुख अॅड.स्वप्नील गलधर यांच्यासह व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष अशोक शेटे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राजूसेठ मुनोत,जेष्ठ पत्रकार जगदिश पिंगळे आदिंनी स्व.अजित दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, पत्रकार संघाचे बीड जिल्हाध्यक्ष संतोष मानूरकर, जेष्ठ पत्रकार विश्वनाथ माणुसमारे, समाजसेविका आम्रपाली साबळे, लोकपत्रकार भागवत तावरे, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष प्रतिक कांबळे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नितीन क्षीरसागर, दै.किसानचे कार्यकारी संपादक शेख अदनान आदि मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप म्हणाले की, माझ्या राजकिय जीवनामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आमचे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्व.गोपीनाथराव मुंडे या चार नेत्यानंतर अजित दादा पवार हे माझ्यासाठी एक भक्कम आधार होते. हे सर्व नेते मला ‘अनिल’ या नावाने बोलत असायचे. त्यांच्या बोलण्यामध्ये वडिलकीचा आणि मोठ्या भावासारखा आधार होता. बीड नगर पालिका निवडणूकीच्या माध्यमातून अजित दादांच्या सहवासात जाण्याचा योग आला. दादांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती. जेव्हा नगर पालिका अजित दादांच्या ताब्यात आली तेव्हा त्यांनी स्वत: माझा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला होता. काम करणार्या कार्यकर्त्याची जाण आणि कदर असणारा तो एक अव्दितीय लोकनेता होता. त्यांच्या अकाली जाण्याने बीड जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेपुढे फार मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे असे अनिल दादा म्हणाले.
या प्रसंगी बोलतांना जिल्हाप्रमुख अॅड.स्वप्नील गलधर म्हणाले की, मी भारतीय जनता पक्षात असताना अनेकदा अजित दादांच्या विरोधात आंदोलने केली. परंतु बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर जेव्हा दादांच्या सहवासात जाण्याचा योग आला तेव्हा मात्र त्यांचे उत्तुंग व्यक्तीमत्व मला प्रभावित करुन गेले. बीड जिल्ह्यात महायुतीचा घटक म्हणून शिवसेनाला न्याय देण्याची भूमिका अजित दादांनी ठेवली होती. तशीच भुमिका भविष्यात उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींनी ठेवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन क्षीरसागर यांनी तर आभार प्रदर्शन प्रतिक कांबळे यांनी केले.
चौकट
व्याख्यानमालेच्या समारोपाला
ना.सुनेत्रा वहिनींना बोलवा
शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल दादा जगताप यांनी अजित स्मृती व्याख्यानमालेच्या उपक्रमाची प्रशंसा केली. ते म्हणाले की, अजित दादांनी बीड जिल्ह्यासाठी जे अभुतपूर्व योगदान दिले त्याची जाणिव ठेवणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. जिल्ह्याच्या विकासाचे अपुर्ण स्वप्न पुर्ण करण्यासाठी बीडच्या पत्रकार संघाने आता उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी यांच्याकडे पाठपुरावा करावा. अजित स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपासाठी वहिनींना निमंत्रीत करुन त्यांच्या पुढे बीड जिल्ह्याचे प्रश्न मांडावेत अशी सूचना जगताप यांनी केली.



