महत्त्वाकांक्षी खुंटेफळ साठवण तलाव योजनेला मिळणार गती आष्टीत नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.२ चे मुख्यालयाचे आ.सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.

महत्त्वाकांक्षी खुंटेफळ साठवण तलाव योजनेला मिळणार गती आष्टीत नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र.२ चे मुख्यालयाचे आ.सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
आष्टी (प्रतिनिधी) गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता कार्यालय आष्टी तालुक्यातील जळगाव येथे नव्याने सुरू करण्यात आले असून, या मुख्यालयाचा उद्घाटन समारंभ आ.सुरेश धस यांच्या हस्ते फीत कापून उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
आष्टी तालुक्यासह परिसरातील सिंचन, जलसंपदा आणि भूसंपादनाशी संबंधित विविध प्रशासकीय कामे अधिक प्रभावीपणे व जलदगतीने पार पडावीत, या उद्देशाने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयाच्या स्थापनेमुळे शेतकऱ्यांना विविध कामांसाठी दूरवर जावे लागणार नसून, त्यांच्या अनेक प्रश्नांचे निराकरण स्थानिक पातळीवरच होणार आहे.
यावेळी बोलताना आ. सुरेश धस यांनी सांगितले की, जलसंपदा विभागाची यंत्रणा तालुकास्तरावर उपलब्ध झाल्याने भूसंपादन प्रक्रिया, कालवा व्यवस्थापन, सिंचनाशी संबंधित तांत्रिक बाबी तसेच विविध विकासकामांना गती मिळेल. विशेषतः खुंटेफळ साठवण तलावात उपसा सिंचनाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला या कार्यालयामुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता वाढून परिसरातील कृषी विकासाला मोठी मदत होईल.
तसेच भविष्यात आष्टी मतदारसंघातील विविध गावांना आणि प्रकल्पांना पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनांच्या नियोजन व अंमलबजावणीसाठीही हे कार्यालय महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार असल्याचे त्यांनी नमूद केले. जलसंपत्तीचे सुयोग्य नियोजन करून शेती, पिण्याचे पाणी आणि विकासकामांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
स्थानिक पातळीवर कार्यालय सुरू झाल्याने नागरिक, शेतकरी आणि विविध लाभार्थ्यांची कामे अधिक सोयीस्कर व वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या उद्घाटन समारंभास नांदूर मधमेश्वर कालवा विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता श्री. कृष्णा घुगे, कर्डिले साहेब, तसेच जलसंपदा विभागातील विविध अभियंते, अधिकारी, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



