बीड
दादांचा आदर्श घेऊन लोकांची कामे करा जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

दादांचा आदर्श घेऊन लोकांची कामे करा
जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
माजी आ. संजय दौंड, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती
बीड ( प्रतिनिधी ) सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्षाची ताकद आहे. नेता गेला म्हणून खचून जाऊ नका, आपल्या नेत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार ह्या सक्षम असून आपल्याकडील पक्षाचे नेतेही सक्षम आहेत, त्यामुळे दादांचा आदर्श घेऊन लोकांची कामे करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण यांनी केले. जिथे अडचण येईल तिथे आपण सर्वजण मिळून उभे राहू. तळागाळातील लोकांच्या अडचणी सोडवू, सत्तेच्या माध्यमातून सर्वांना सोबत घेऊन स्व. अजितदादा पवार यांनी बीड शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करू असा विश्वासही ॲड. चव्हाण यांनी व्यक्त केला.व
बीड शहरातील मित्र नगर चौक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित पदाधिकारी, कार्यकर्ते संवाद बैठकीत जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण बोलत होते. यावेळी माजी आ. संजय दौंड, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे, नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे, शेख मुजीब, उप नगराध्यक्ष विनोद मुळूक, गटनेते फारुक पटेल, स्थायी समिती सदस्य अमर नाईकवाडे, ज्येष्ठ नेते मोईन मास्टर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा सभापती शेख निजाम, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य शेख तय्यबभाई, दिलीप गोरे, भागवत तावरे, महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई खोसरे, प्रिया डोईफोडे, अशोक हिंगे , बळीराम गवते, बाळासाहेब गुंजाळ, रंजीत बनसोडे, भैय्या मोरे, अजिंक्य अनेराव, सय्यद सादेक अली , महेश धांडे, भीमराव वाघचौरे ,शितल धोंडरे,प्रणिता पवार, शेख शाकेरा, संजीवनी देशमुख आदींची उपस्थिती होती. यावेळी ॲड. राजेश्वर चव्हाण म्हणाले की, स्व.अजितदादा पवार यांच्या विचार आणि करण्याची पद्धत आपल्यासाठी प्रेरणा देणारी आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खचून न जाता मोठ्या ताकदीने जनतेत जावं. लोकांची अनेक कामे आहेत, अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे. आपल्याकडील पक्षाचे नेते अमरसिंह पंडित, आ. प्रकाशदादा , आ. धनंजय मुंडे हे सर्व सक्षम नेते आहेत. स्व. अजितदादांनी जिल्हा वासियांना विकासाचा शब्द दिलेला आहे तो शब्द आणि ती कामे आता आपल्याला सर्वांना मिळून पूर्ण करायची आहेत. पक्ष वाढवायचा म्हटल्यावर आपल्याला सर्वांना काम करावे लागणार आहे. शासकीय कार्यालयांमध्ये लोकांची कामे असतील त्यासाठी पाठपुरावा करा. त्यांची कामे कशी मार्गी लागतील यासाठी प्रयत्न करा. जिथे अडचण येत असेल तिथे आपण सोबत जावून संबंधित अधिकाऱ्यांना भेटू असेही ॲड. चव्हाण यांनी सांगितले. आपल्या पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचा वापर जनतेची कामे करण्यासाठी करा. त्यांचे काही प्रश्न असतील तर ते कार्यालयात बसून सोडवा. बीड शहरातही आपल्याकडे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे सर्वजण मिळून आणि एक विचाराने कामे करा असे आवाहन त्यांनी केले. माजी आ. संजय दौंड म्हणाले की, दादांच्या पश्चात आपल्याला त्यांनी दिलेल्या शब्दावर पूर्ण काम करायचे आहे. दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपल्याला जनतेने बीड , धारूर, परळीत नगर पालिकेची सत्ता दिलेली आहे. आता आपल्यालाही कामे करून जनतेचा विश्वास सार्थ ठरवावा लागणार आहे. त्यामुळे सर्वांनीच एकदिलाने, एकजुटीने आणि एकविचाराने काम करू पक्ष वाढवावा असे आवाहन माजी आ. संजय दौंड यांनी केले.
चौकट
जिल्हा कार्यालयात
भागवत तावरे अधिकृत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भागवत तावरे हे जिल्हा कार्यलयात अधिकृत बसतील आणि पक्षाचा कार्यक्रम राबवतील असे जिल्हा अध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी जाहीर केले . सुसज्ज कार्यालय भागवत तावरे यांच्याकडे आल्याने पक्षीय कार्यक्रम तथा कार्यकर्त्यांना हक्काचा माणूस उपलब्ध झाल्याची भावना व्यक्त होत आहे .
चौकट
नगराध्यक्षा म्हणून प्रेमलताताई
यांची पहिलीच पक्ष बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आ. संजय दौंड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस बीड शहराच्या नगराध्यक्षा प्रेमलताताई पारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्षा म्हणून प्रेमलताताई यांची पहिलीच पक्ष बैठक होती.



