बीड

श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावात भक्ती आणि शक्तीच्या संगमाने ‘महापूजा’ सोहळा संपन्न

श्रीवर्धन तालुक्यातील धारवली गावात भक्ती आणि शक्तीच्या संगमाने ‘महापूजा’ सोहळा संपन्न

भवानी माता, कळेश्वरी माता आणि धारेश्वराच्या साक्षीत रंगला भक्तीचा जागर; दीपक सुर्वे यांच्या अभंगवाणीने भाविक मंत्रमुग्ध
श्रीवर्धन (संदेश घोलप)
श्रीवर्धन तालुक्यातील निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या धारवली गावामध्ये यावर्षीचा ‘श्री सत्यनारायण महापूजा’ सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला. भवानी माता, कळेश्वरी माता तसेच गावाचे आराध्य दैवत भगवान शिव शंकर धारेश्वर मंदिराच्या पावन सानिध्यात हा सोहळा पार पडला.
धारवली ग्रामस्थ व ग्राम-विकास मंडळ (मुंबई), जय भवानी महिला मंडळ आणि धारेश्वर जनसेवा मंडळ (रजि.) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मुंबईस्थित चाकरमानी तसेच स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातही गावाशी असलेली नाळ जपणाऱ्या चाकरमान्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
कार्यक्रमाची सुरुवात शास्त्रोक्त पूजनाने करण्यात आली. यावेळी श्री प्रासादिक भजन मंडळाचे गायक दत्ताराम सुर्वे बुवा यांचे चिरंजीव दीपक सुर्वे यांच्या अभंग गायनाने उपस्थित भाविकांना भक्तिरसात चिंब भिजवले. धारेश्वर मंदिर परिसरात घुमणाऱ्या अभंगवाणीमुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.
धार्मिक विधींसोबतच सामाजिक विकासाचाही संदेश या व्यासपीठावरून देण्यात आला. धारेश्वर जनसेवा मंडळाने शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध उपक्रमांचा आढावा सादर केला. “दैवतांच्या आशीर्वादाने गावाचा विकास आणि तरुण पिढीला योग्य दिशा देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे,” असे मत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
भव्य मंडप, गुलाबी-पांढऱ्या सजावटीने नटलेले व्यासपीठ आणि शिस्तबद्ध नियोजन यामुळे कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला. तरुणांच्या उत्साहाला ज्येष्ठांचे मार्गदर्शन लाभल्याने संपूर्ण सोहळा अत्यंत नेटका आणि यशस्वी झाला. पूजेनंतर हजारो भाविकांनी श्रद्धेने महाप्रसादाचा लाभ घेतला.
या मंगलमयी प्रसंगी पंचायत समिती सदस्य व माजी सभापती सुकुमार तोंडळेकर, श्यामभाई भोकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळाच्या वतीने उपस्थित पाहुण्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
याचबरोबर धारेश्वर जनसेवा मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महिला व लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गाव भक्ती, संस्कृती आणि सामाजिक एकतेच्या रंगात न्हाऊन निघाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
Back to top button