महाराष्ट्र

सोनार समाजाचा भव्य राज्यस्तरीय महोत्सव ३ मे रोजी नागपुरात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार उद्घाटन

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी;

नागपूर : महाराष्ट्रातील सोनार समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरणारा भव्य, सर्वशाखीय राज्यस्तरीय सोनार महोत्सव सोहळा रविवार, दि. ३ मे २०२६ रोजी नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आणि ‘सुवर्णालंकार’ मासिकाच्या ३० व्या वर्धापनदिनानिमित्त या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या भव्य कार्यक्रमात राज्यभरातील सोनार समाजाच्या विविध घटकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग अपेक्षित आहे. विशेष म्हणजे, राज्यस्तरीय महिला मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिला अध्यक्ष, पदाधिकारी आणि समाजातील अग्रणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाला नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहराज्यमंत्री पंकज भोयर, आमदार चित्रा वाघ, नागपूरच्या महापौर निता ठाकरे, बिहारचे खासदार राजेश वर्मा, राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र वर्मा, भा. सुवर्णकार संघाचे अध्यक्ष दुलिचंद कडेल तसेच जबलपूर सराफा सुवर्णकार संघाचे अध्यक्ष राजा सराफ आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रवीण दटके तसेच माजी आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र स्वर्णकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे, संस्थाध्यक्ष विलास बांगरे व स्वागताध्यक्ष राजेश रोकडे राहणार आहेत.

या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्यभरातून निवडून आलेल्या सोनार समाजाच्या नगराध्यक्षांसह तब्बल ४५ नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा होणार आहे. समाजाच्या राजकीय व सामाजिक उन्नतीत योगदान देणाऱ्या या लोकप्रतिनिधींना गौरविण्यात येणार आहे. तसेच महिला मेळाव्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘महाराष्ट्र सुवर्णरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.

महोत्सवाच्या पहिल्या सत्रात समाजाच्या विविध समस्या, व्यवसायातील अडचणी, बदलत्या आर्थिक परिस्थितीतील आव्हाने, नव्या पिढीचे मार्गदर्शन आणि संघटनात्मक बळकटीकरण या विषयांवर सखोल चर्चा व विचारमंथन होणार आहे. हे सत्र समाजाच्या भविष्यासाठी दिशा ठरवणारे ठरणार असल्याचे आयोजकांचे मत आहे.

दुसऱ्या सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असणार असून विविध सोनार संस्थांमधील कलाकार पारंपरिक व आधुनिक कलांचा सुरेख संगम सादर करणार आहेत. या कार्यक्रमामुळे उपस्थितांना एक समृद्ध सांस्कृतिक अनुभव मिळणार आहे.

या भव्य महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे, अध्यक्ष विलास बांगरे, महासचिव अनिल मालोकर, महिला समिती अध्यक्षा वर्षा निनावे तसेच ‘सुवर्णालंकार’चे मुख्य संपादक प्रकाश माथने यांनी केले आहे.

या भव्य सोहळ्यामुळे सोनार समाजाच्या ऐक्याला नवे बळ मिळणार असून सामाजिक, सांस्कृतिक आणि संघटनात्मक पातळीवर समाज अधिक सक्षम होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Back to top button