बीड
बीडमध्ये उसळला भीमसागर! आनंद शिंदेंच्या भीम गीतांत न्हाऊन निघाले बीडकर

बीडमध्ये उसळला भीमसागर!
आनंद शिंदेंच्या भीम गीतांत न्हाऊन निघाले बीडकर
बीड दि.१९ (प्रतिनिधी)- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्त रविवारी झालेल्या आनंद शिंदे यांच्या भीम गीतांच्या कार्यक्रमास भीमसागर उसळला. यावेळी आनंद शिंदेंनी सादर केलेल्या भीम गीतांत बीडकर न्हाऊन निघाले.
बीडचे आ. संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. दरम्यान सायंकाळी बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे ख्यातनाम लोकगायक आनंद शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास बीड शहर व परिसरातील भीम सैनिकांनी अलोट गर्दी केली. यावेळी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून भीम गीतांच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. गायक आनंद शिंदे यांनी एकाहून एक भीम गीतं सादर करत उपस्थित भीमसैनिकांच्या भावनांना हात घातला.
आ. संदीप क्षीरसागर यांचे चोख नियोजन आणि भीमकन्यांचा सन्मान!
महापुरुषांच्या जयंतीत जीव ओतून काम करण्यासाठी सर्वदूर परिचित असलेले आ. संदीप क्षीरसागर यांनी भीम गीतांच्या कार्यक्रमाचे चोख नियोजन केले होते. विशेष म्हणजे आ. क्षीरसागर यांच्या नियोजनातून या कार्यक्रमास उपस्थित सर्व भीम कन्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आला.



