बीड
“वाळू माफियांचा उघड दहशतवाद!” – चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला गाडीखाली चिरडण्याची धमकी; पैठण हादरले

“वाळू माफियांचा उघड दहशतवाद!” – चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराला गाडीखाली चिरडण्याची धमकी; पैठण हादरले
जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा दाखल; पत्रकार संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर
वाळू उपशामागे कोणाचे संरक्षण? प्रशासनावर प्रश्नचिन्ह
पैठण | किरण काळे
अवैध वाळू उपशाचा पर्दाफाश करण्यासाठी चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारालाच उघडपणे जीवे मारण्याची धमकी देत दहशत माजविण्याचा संतापजनक प्रकार पैठणमध्ये घडला आहे. “माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही” अशी सरळ धमकी देणाऱ्या आरोपीच्या बिनधास्त वागण्यामुळे वाळू माफियांची पकड किती मजबूत आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
एका दैनिकाचे पैठण तालुका प्रतिनिधी पत्रकार नंदकिशोर राधाकिसन मगरे (रा.लक्ष्मीनगर, पैठण) हे दि.२८ एप्रिल रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना आय.टी.आय. परिसरात वाळूने भरलेले हायवा डंपर दिसले. संशय बळावल्याने त्यांनी मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले.मात्र, हेच कर्तव्य त्यांच्या जीवावर बेतण्याची वेळ आली.
यावेळी रमेश उर्फ लालू तुकाराम वीर वाळूतस्कर हा आरोपी स्कुटीवरून घटनास्थळी येताच त्याने पत्रकाराला अडवले. “तुम्ही पत्रकार आमच्या वाळूच्या बातम्या लावता…” म्हणत त्याने थेट वादाला सुरुवात केली.पुढे संतापाच्या भरात त्याने जातीवाचक शिवीगाळ करत, “बातमी लावली तर गाडीखाली चिरडून टाकीन,” अशी उघड धमकी दिली.या घटनेतून आरोपीची निर्भयता आणि कायद्याची भीती संपल्याचे स्पष्ट दिसून येते.
या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस उपअधीक्षक स्तरावर सुरू असला तरी,
अवैध वाळू उपसा इतका बिनधास्तपणे कसा सुरू आहे? आणि त्यामागे नेमके कोणाचे छत्र आहे? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
या घटनेमुळे पत्रकारांमध्ये प्रचंड संताप उसळला असून,अवैध धंदे उघड करणाऱ्यांनाच लक्ष्य केले जात असल्याची भावना बळावली आहे.
“पत्रकार सुरक्षित नाहीत, तर सत्य बाहेर येणार कसे?”
हा मूलभूत प्रश्न आता पैठणमध्ये ऐरणीवर आला आहे.दरम्यान, आरोपीवर कठोर कारवाई करून वाळू माफियांवर लगाम लावण्याची जोरदार मागणी होत आहे.



