बीड

वेळासमध्ये गुन्हेगारांवर आता ‘तिसरी नजर’ रोखणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित

वेळासमध्ये गुन्हेगारांवर आता ‘तिसरी नजर’ रोखणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही प्रकल्प कार्यान्वित
श्रीवर्धन तालुक्यात सुरक्षिततेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार; दिघी सागरी पोलिसांकडून उपक्रमाचे कौतुक
श्रीवर्धन/दिघी (संदेश घोलप )
श्रीवर्धन तालुक्यातील वेळास परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांची झोप उडवली होती. या समस्येवर केवळ चर्चा न करता, वेळासच्या ग्रामस्थांनी आणि मित्रपरिवाराने एकजुटीने पाऊल उचलले आहे. ‘आपलं गाव, आपली सुरक्षा’ या ध्येयाने लोकसहभागातून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी उभारला निधी
वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. ही भीती दूर करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धवल तवसाळकर व त्यांच्या मित्रपरिवाराने पुढाकार घेऊन ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांच्या संयुक्त सहकार्याने निधी उभारून हा प्रकल्प मार्गी लावला. गावातील प्रमुख तीन रस्त्यांवर, जेथून वर्दळ जास्त असते, अशा मोक्याच्या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत.
पोलीस प्रशासनाची शाबासकी
या प्रकल्पाचे अधिकृत उद्घाटन दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आवटी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना आवटी म्हणाले की, “गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज आहे. ग्रामस्थांनी स्वखर्चातून केलेली ही सोय पोलिसांच्या तपासाला गती देणारी ठरेल. या उपक्रमामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होईल.” त्यांनी या कार्यासाठी धवल तवसाळकर यांचे विशेष अभिनंदन केले.
 आगामी काळात व्याप्ती वाढवणार
गावाच्या सुरक्षिततेबाबत बोलताना धवल तवसाळकर यांनी सांगितले की, “मित्रपरिवार आणि ग्रामस्थांच्या मदतीमुळेच हे शक्य झाले आहे. सध्या मुख्य रस्ते सुरक्षित केले आहेत, मात्र भविष्यात गावातील इतर अंतर्गत गल्ल्या आणि सार्वजनिक ठिकाणेही सीसीटीव्हीच्या कक्षेत आणण्याचा आमचा मानस आहे.”असे यावेळी नमूद केले.
या उपक्रमासाठी माजी सरपंच सुरेश धोपट, सुदर्शन शिळकर, बावा मुरकर, विकेश लाड, संदीप दिवेकर, ऋतुराज शिळकर, उदय पाटील, संतोष शिळकर, नितेश तोंडलेकर, साहिल दळवी, विनोद लाड, आयुष दिवेकर, गणेश आडवीलकर, अनंत अपराध, अनुज अपराध, अरुण शिरधनकर यांसह वेळास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून संपूर्ण तालुक्यातून या कार्याचे कौतुक होत आहे.
Back to top button