बीड
मोरवड गावात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वाटप व जलसंधारणातून विविध विकासाचा धडाका..!

मोरवड गावात शेतकऱ्यांना ठिबक सिंचन वाटप व जलसंधारणातून विविध विकासाचा धडाका..!
जनतेच्या सहभागातून घडतोय आदर्श गाव- सरपंच विवेक अंडील
बीड प्रतिनिधी :-
दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील डोंगरपट्ट्यावर वसलेले मोरवड (ता. वडवणी, जि. बीड) हे गाव विकासाच्या नव्या लाटेचा साक्षीदार ठरत आहे. या भागात पाण्याची तीव्र टंचाई असून त्याचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादन देणारी ठिबक सिंचन (Drip Irrigation) प्रणाली शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.ही बाब लक्षात घेऊन एस.यू.डी. लाईफ फाउंडेशन व लोकसहभागाच्या माध्यमातून मोरवड गावातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे दुष्काळी भागातील शेतीला नवसंजीवनी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. यावेळी बोलताना सरपंच विवेक अंडील यांनी सांगितले की, ठिबक सिंचनामुळे गावातील शेतकऱ्यांना शंभर टक्के फायदा होणार असून उत्पन्नात वाढ होऊन त्यांची आर्थिक परिस्थिती निश्चितच सुधारेल. तसेच जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन व शेततळ्याची पन्नी टाकून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.सरपंचांनी पुढे सांगितले की, एस.यू.डी. लाईफ फाउंडेशन च्या माध्यमातून गावातील शाळेला वॉल कंपाऊंड देण्यात आला, सहा नवीन पाझर तलाव निर्माण करण्यात येत आहेत,जलसंधारणासाठी तब्बल ५०० जलकुंड उभारण्यात आले आहेत. तसेच डोंगर परिसरात ५,००० झाडांची लागवड करण्यात आली असून शेततळे तयार करण्यात आली आहेत. भविष्यातही उर्वरित विकासकामे करण्याचा मानस असल्याचे सांगत आले आहे यावेळी एस यु डी संस्थेचे संचालक राकेश कुमार, विजय पगारे,संस्थेचे कर्मचारी राम जाधव, तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



