बीड

क्लासेसमधील गर्दीत विद्यार्थ्यांचे भवितव्य हरवू देऊ नका — माजी प्राचार्य विठ्ठल काळे यांचे प्रतिपादन 

क्लासेसमधील गर्दीत विद्यार्थ्यांचे भवितव्य हरवू देऊ नका — माजी प्राचार्य विठ्ठल काळे यांचे प्रतिपादन
अचिव्हर्स अकॅडमीतर्फे करिअर मार्गदर्शन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात
बीड (प्रतिनिधी): लक्ष्मण घायतिडक
आजच्या स्पर्धात्मक युगात मोठ्या शहरांमध्ये एकाच वर्गात १५०० पर्यंत विद्यार्थी बसवले जातात. अशा अफाट गर्दीत प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देणे शक्य होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची खरी प्रगती होत आहे का, याचा पालकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. केवळ गर्दीचा भाग बनून विद्यार्थ्यांचे भवितव्य हरवू देऊ नका, असे परखड प्रतिपादन स्वा. सावरकर कनिष्ठ महाविद्यालय, बीडचे माजी प्राचार्य विठ्ठल काळे यांनी केले. अचिव्हर्स अकॅडमी, बीड यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, बक्षीस वितरण व करिअर मार्गदर्शन या कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा.प्रदीप रोडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मा. प्रदीप गाडे (माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, जवळा-म्हाळस), मा. भारत मगर (मुख्याध्यापक, भीमसिंह विद्यालय, मातोरी) आणि मा. भीमराव मिसाळ (शालेय समितीचे अध्यक्ष, खोकरमोहा), मा.के. डी. राऊत, अचिव्हर्स अकॅडमीचे संचालक प्रा.अर्जुन राठोड, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डी.डी.राऊत उपस्थित होते.
पुढे बोलताना विठ्ठल काळे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठी प्रा. प्रदीप रोडे व त्यांच्या टीमने उचललेले पाऊल धाडसी असल्याचे नमूद केले. केवळ ५० ते १०० विद्यार्थ्यांच्या मर्यादित बॅचेस आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचा थेट संवाद यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात प्रा. प्रदीप रोडे यांनी विद्यार्थ्यांच्या घडणीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. चुकीचा मित्रपरिवार आणि मोबाईलचा अतिरेक हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे असल्याचे त्यांनी नमूद केले. जिथे शिस्त आहे, तिथेच यश आहे, असे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर राहावे, हीच संस्थेची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्तावनेत प्रा.अर्जुन राठोड यांनी अकॅडमीतील अत्याधुनिक सुविधा, मजबूत पायाभूत सुविधा आणि अनुभवी फॅकल्टीबाबत सविस्तर माहिती दिली. तुमची मेहनत हेच आमचे खरे यश आहे, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
यानंतर अचिव्हर्स अकॅडमीच्या वतीने जानेवारी २०२६ मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘एन्ट्रन्स टेस्ट’मधील प्रत्येक विद्यालयातील टॉप टेन गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व बक्षीस वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रा. संजय खाडे, प्रा. के. एल. मीना, प्रा. अमरजित चौधरी, प्रा. बबिता मॅडम, माधुरी घुमरे मॅडम यांच्यासह विद्यार्थी, पालक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किशोर वाघमारे यांनी तर आभार डॉ. विकास वाघमारे यांनी मानले.
Back to top button