बीड
ईदनिमित्त आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी मुस्लिम समाजाला मिळाली भेट

ईदनिमित्त आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांनी मुस्लिम समाजाला मिळाली भेट
अल्पसंख्याक मुलींसाठी लवकरच सुसज्ज वसतिगृह उभारणार, जागेचा प्रश्न मार्गी लागला
दिवंगत अजितदादांच्या स्मृतींना उजाळा देत मानले सुनेत्राताईंचे आभार
बीड दि.२१ (प्रतिनिधी):- रमजान ईदच्या पर्वावर मुस्लिम समाजाला आ.संदीप क्षीरसागर यांच्या प्रयत्नांमुळे मोठी भेट मिळाली आहे. बीड शहरात लवकरच अल्पसंख्याक मुलींसाठी स्वतंत्र, सुसज्ज वसतीगृह उभारले जाणार आहे. या वस्तीगृहाच्या कामासाठी आ शासनस्तरावरून मंजुरी अगोदरच मिळालेली आहे. परंतु जागा उपलब्धततेच्या प्रश्नामुळे काम सुरू होण्यास अडचण येत होती. परंतु आ.संदीप क्षीरसागरांच्या पाठपुराव्यामुळे ती अडचणही दूर झाली आहे. शहरातील किल्ला मैदान येथे असलेल्या डाक बंगल्याची जागा आता वसतीगृहासाठी उपलब्ध झाली असून लवकरच प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. याबद्दल आ.संदीप क्षीरसागर यांनी दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या स्मृतींना उजाळा देत राज्याच्या उपमुख्यमंत्री, अल्पसंख्याक मंत्री तसेच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांचे आभार मानले आहेत.
अल्पसंख्यांक समाजातील उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी बीड शहरात एक सुसज्ज वसतीगृह असावे, जेणेकरून बीड मतदासंघातील आणि जिल्ह्यातील विद्यार्थीनिंना याचा फायदा होईल. यासाठी आ.संदीप क्षीरसागर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. त्यातून बीड शहरात अल्पसंख्याक मुलींसाठी वसतीगृह बांधकामास शासनाकडून निधीसह मंजूरी मिळाली होती. परंतु यासाठी योग्य जागा उपलब्ध असण्याची गरज होती. याबाबतही आ.क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला. परिणामी बीड शहरातील किल्ला मैदान परिसरातील नगर परिषदेच्या बंद आणि निकामी असलेल्या किल्ला मैदानाची जागा ही वसतीगृहासाठी योग्य असल्याने ती उपलब्ध करण्याबाबत प्रक्रिया करण्यात आली. आणि आता शासनाच्या नियमानुसार ही जागा नगर विकास विभागाच्या अखत्यारीत असल्याने प्रथमतः महसूल व वनविभागाला प्रत्यार्पित करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने प्रत्यार्पणाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री सुनेत्राताई पवार यांनी आ.संदीप क्षीरसागर यांना कळविले आहे. लवकरच ही सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन जागा उपलब्ध झाल्यावर लवकरच वस्तीगृहाच्या बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात येणार आहे. त्यामुळे आ.संदीप क्षीरसागर यांनी अल्पसंख्याक विभागासह शासनाचे आभार मानले आहेत. दरम्यान आ.क्षीरसागर हे या संदर्भात सातत्याने प्रयत्नशील आहेत. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही त्यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता.


