बीड

श्रीवर्धनमध्ये ‘वीज बचती’चा फज्जा: PWD कार्यालय सुट्टीतही २४ तास उजळले दिवे,

श्रीवर्धनमध्ये ‘वीज बचती’चा फज्जा: PWD कार्यालय सुट्टीतही २४ तास उजळले दिवे,

PWD कार्यालयात विजेची होळी:

श्रीवर्धन (संदेश घोलप) – शासनाकडून ‘वीज वाचवा’ मोहिमेद्वारे जनजागृती केली जात असताना, दुसरीकडे सरकारी कार्यालयांतच विजेचा उघड अपव्यय होत असल्याचे धक्कादायक चित्र श्रीवर्धनमध्ये समोर आले आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कार्यालय सलग चार दिवसांच्या शासकीय सुट्ट्यांमुळे पूर्णपणे बंद असतानाही, परिसरातील बाहेरील दिवे दिवस-रात्र सुरूच असल्याचे निदर्शनास आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सुट्टीच्या काळात कार्यालयात कोणतेही प्रशासकीय कामकाज सुरू नव्हते. तरीही मुख्य प्रवेशद्वार, आवार आणि इमारतीच्या बाहेरील भागातील दिवे २४ तास सुरू ठेवण्यात आले होते. सलग चार दिवस कोणीही हे दिवे बंद करण्याची तसदी घेतली नसल्याने मोठ्या प्रमाणावर विजेचा अपव्यय झाल्याची चर्चा आहे.
स्थानिक नागरिकांनी या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “सामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे देणारे प्रशासन स्वतः मात्र नियम पाळत नाही,” अशी टीका नागरिकांकडून होत आहे. वीजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निष्काळजीपणा अधिक गंभीर मानला जात आहे
या घटनेमुळे शासनाच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक भार पडत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ऊर्जा बचतीबाबत कठोर निर्देश असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. करदात्यांच्या पैशांतून चालणाऱ्या कार्यालयातच असा अपव्यय होत असल्याने जबाबदारी निश्चित करण्याची मागणी जोर धरत आहे.
सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आणि जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘वीज बचत’चा संदेश केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसला पाहिजे, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Back to top button