अंजनगाव सुर्जी परिसरात वाढत्या चैन स्नॅचिंगच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासन सतर्क; नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन

पंकज हिरुळकर जिल्हा प्रतिनिधी
अमरावती : मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त अंजनगाव सुर्जी शहर व परिसरात महिलांची ये-जा मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हळदीकुंकू कार्यक्रम, सामाजिक भेटीगाठी तसेच धार्मिक कार्यक्रमांमुळे सार्वजनिक ठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळत असून, या पार्श्वभूमीवर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशनतर्फे विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
अंजनगाव सुर्जी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सूरज बोंडे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, सणासुदीच्या काळात चैन स्नॅचिंगच्या घटना टाळण्यासाठी महिलांनी शक्यतो उघडपणे सोन्याचे दागिने परिधान करणे टाळावे. विशेषतः गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, मंदिर परिसर तसेच एकट्याने प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दुचाकीवरून येत गळ्यातील मंगळसूत्र किंवा सोन्याची चैन हिसकावून नेण्याच्या घटना राज्यातील विविध भागांत घडत असल्याने खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना काही महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. चेहरा दुपट्टा, रुमाल किंवा हेल्मेटने पूर्णपणे झाकलेले संशयास्पद व्यक्ती परिसरात फिरताना दिसल्यास, तसेच नंबर प्लेट नसलेली, झाकलेली किंवा चिखलाने अस्पष्ट केलेली मोटारसायकल संशयास्पदरीत्या फिरताना आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अशा वाहनांचा वापर करून गुन्हेगार हालचाल करत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी समोर आल्या आहेत.
तसेच महिलांनी प्रवासादरम्यान मोबाईल वापरताना किंवा पर्स हाताळताना आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवावे, अनोळखी व्यक्तींशी अनावश्यक संवाद टाळावा आणि शक्यतो समूहाने प्रवास करावा, असेही पोलिसांनी सुचवले आहे. घराबाहेर पडताना मौल्यवान दागिने सुरक्षित ठेवणे, तसेच आवश्यक असल्यास कृत्रिम दागिन्यांचा वापर करणे हीदेखील प्रभावी सुरक्षिततेची उपाययोजना ठरू शकते.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आश्वस्त करत सांगितले की, शहर व परिसरात पोलीस गस्त वाढविण्यात आली असून संवेदनशील भागांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. मात्र, गुन्हे प्रतिबंधासाठी नागरिकांचे सहकार्य तेवढेच महत्त्वाचे असल्याचे ठाणेदार सूरज बोंडे यांनी स्पष्ट केले.
“आपली सतर्कता हीच आपली खरी सुरक्षा आहे,” असे सांगत कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास विलंब न लावता पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.



