दिव्यांग आता एकटे नाहीत, त्यांच्या सोबत ग्रामीण विकास केंद्र संस्था आहे : डॉ.सुनिल बोराडे

दिव्यांग आता एकटे नाहीत, त्यांच्या सोबत ग्रामीण विकास केंद्र संस्था आहे : डॉ.सुनिल बोराडे
ग्रामीण विकास केंद्र व इनॅबल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गर्व से सेंटर’चे उद्घाटन
जामखेड : आरोग्य खात्याच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दिव्यांगांना मदत करण्यात आली असून पुढील काळातही संस्थेशी समन्वय साधून दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्यात येईल,दिव्यांग आता एकटे नाहीत तर त्यांच्यासोबत ग्रामिण विकास केंद्र संस्था आहे,असे प्रतिपादन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल बोराडे यांनी व्यक्त केले.
आज दिनांक १९ जानेवारी २०२६ रोजी येथील ग्रामीण विकास केंद्र व इनॅबल इंडिया, बेंगलोर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण विकास केंद्र या संस्थेच्या कार्यालयात ‘गर्व से सेंटर’चे उद्घाटन व फलक अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमासाठी नायब तहसीलदार किशोरी त्र्यंबके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनिल बोराडे, इनॅबल इंडिया चे राज्य समन्वयक विकास गडदे,सचिव उमाताई जाधव, संचालक बापूसाहेब ओव्होळ,प्रहार चे जयसिंग उगले, नय्यूम सुभेदार,नगरसेवक ॲड.डाॅ.अरुण जाधव,नगरसेविका संगिताताई भालेराव,आदिवासी नेते,विशाल पवार,सचिन भिंगारदिवे,रोहन पिंपळे आदी मान्यवरांसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.
यावेळी इनॅबल इंडिया चे राज्य समन्वयक विकास गडदे यांनी बोलताना सांगितले की,दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही संस्था एकत्रितपणे रचनात्मक कार्य करणार आहे, तसेच दिव्यांगांना कौशल्याधारित व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यावर भर देण्यात येणार असून, या माध्यमातून त्यांना मान-सन्मान मिळेल, असे उपक्रम राबविले जातील. यासाठी शासनाच्या विविध अधिकाऱ्यांचे सहकार्य घेतले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नायब तहसीलदार किशोरी त्र्यंबके बोलताना म्हणाल्या की, शासन दिव्यांगांच्या पाठीशी असून आता काळजी करण्याची नाही. ग्रामीण विकास केंद्र व शासन एकत्रितपणे दिव्यांगांना मदत करेल.
यावेळी प्रहार संघटनेचे जयसिंग उगले व नय्यूम सुभेदार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रजनी औटी, निता इंगळे, उर्मिला कवडे, ऋषीकेश गायकवाड व ललिता पवार,मंगल शिंगाणे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाची प्रस्तावना बापूसाहेब ओव्होळ तसेच सूत्रसंचालन संतोष चव्हाण यांनी केले, तर आभार उमाताई जाधव यांनी मानले.



