जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत बाबासाहेब परांजपे विद्यालयाची घवघवीत कामगिरी

जिल्हास्तरीय दिव्यांग क्रीडा स्पर्धेत बाबासाहेब परांजपे विद्यालयाची घवघवीत कामगिरी
*अंबाजोगाई प्रतिनिधी;*
अंबाजोगाई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग मुला-मुलींच्या क्रीडा स्पर्धेत बाबासाहेब परांजपे निवासी दिव्यांग विद्यालय, अंबाजोगाई येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ९ प्रथम, ३ द्वितीय व २ तृतीय क्रमांक मिळवत एकूण १५ पारितोषिके पटकावली.
अ गटात सुशाला महादेव वाघमोडे हिने १०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला. प्रीती गजानन गायकवाड हिने १०० व २०० मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवून दुहेरी यश मिळवले. ब गटात अनिकेत कारभारी देवकते याने ५० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक पटकावला.
क गटात प्रतीक्षा सिद्धेश्वर वडणे हिने ५० मीटर धावणे व व्हीलचेअर रेस या दोन्ही क्रीडा प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवला. प्रतीक्षा राम खटके हिने व्हीलचेअरवर बसून सॉफ्टबॉल थ्रो या क्रीडा प्रकारात प्रथम, तर व्हीलचेअर रेस मध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. कुलदीप मारुती पवार याने बसून गोळाफेक मध्ये द्वितीय तर व्हीलचेअर रेस मध्ये तृतीय क्रमांक मिळवला. तसेच करण रामेश्वर हेमके याने अ गटातून १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला. चैतन्य रवींद्र इटकर याने संबंधित क्रीडा प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवला.
याशिवाय, सांस्कृतिक कार्यक्रमात बाबासाहेब परांजपे निवासी दिव्यांग विद्यालयाने प्रभावी थीम सॉंग सादर करून प्रथम क्रमांक पटकावला.
या यशाबद्दल जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माननीय प्रियाराणी पाटीलमॅडम, वै.सा.का. अंकुशराव नखाते, मुख्याध्यापिका ललिता चव्हाण तसेच क्रीडा मार्गदर्शक गोविंद जगधने यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.



