संपादकीय

माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

माजलगाव (प्रतिनिधी): युनोने १९७५ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केले. त्यानंतरची दहा वर्षे महिला दशक म्हणून जाहीर झाले. यावर्षी (२०२५) या घटनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदने महाराष्ट्रातील महिलांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन अनेक उपक्रम हाती घेतले. त्यापैकी एक सार्वजनिक वाहन स्थानकांवर महिला किती सुरक्षित आहेत त्याचा लेखाजोखा. या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्राभर एस टी बस स्थानके व रेल्वे स्थानकांचे सेफ्टी ऑडीट करण्यात आले.  

माजलगाव विकास प्रतिष्ठानने माजलगाव व तेलगाव या बस स्थानकांचे नुकतेच सेफ्टी ऑडीट केले. या ऑडिट दरम्यान मिळालेले अनुभव आणि निरीक्षणे यांच्या आधारे सुरक्षितता आणि मूलभूत हक्क या महत्त्वाच्या विषयावर आधारित पथनाट्याची निर्मिती करण्यात आली. या नाट्यप्रयोगाद्वारे सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आणि प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क यांविषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. नवरात्र महोत्सवात स्त्रियांचा सहभाग लक्षणीय असतो. त्या निमित्ताने हे पथनाट्य वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्यात आले. 

यामागे सामाजिक जागृतीचा संदेश देण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता. सुरक्षितता ही केवळ शासकीय यंत्रणांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे, हा संदेश या नाट्याद्वारे प्रभावीपणे मांडण्यात आला.या पथनाट्य सादरीकरणात सिंदफणा पब्लिक स्कूल चे सांस्कृतिक विभाग प्रमुख सखाराम जोशी यांच्यासह अनेक शिक्षकांनी सक्रिय सहभाग घेतला. प्रवीण मडके, कृष्णा नवले, वरुणराज तौर, प्रवीण तिवारी, मलिक शेख,ज्योती जोशी, अर्चना जाधव, अश्विनी सोळंके या शिक्षकांनी आणि इयत्ता आठवीचा विद्यार्थी उसेद शेख तसेच मीना कदम या शिक्षकेतर कर्मचारी यांनी नाट्याला प्रभावी स्वरूप दिले. शिक्षकांच्या या सक्रिय सहभागामुळे सामाजिक जबाबदारीच्या संदेशाला अधिक वजन मिळाले.

बस स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही ज्वलंत आहे. या पथनाट्याद्वारे सार्वजनिक ठिकाणांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि नागरिकांच्या हक्कांबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद आणि माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. भविष्यातही अशाच जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Back to top button