जामखेडच्या साई नगरमध्ये पावसामुळे जलभराव; नागरिकांचे हाल, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप

जामखेडच्या साई नगरमध्ये पावसामुळे जलभराव; नागरिकांचे हाल, प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप
जामखेड (प्रतिनिधी) – जामखेड शहरातील मोरे वस्ती येथील साई नगरमध्ये मंगळवार रात्री झालेल्या पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत. याठिकाणी जामखेड नगर परिषदेकडून कोणतीही ड्रेनेज सुविधा उपलब्ध नसल्याने घरासमोरच तळ्यासारखा पाण्याचा साठा निर्माण झाला आहे.
जलभरावामुळे नागरिकांना घराबाहेर पडण्यासाठी रस्ताही उपलब्ध नाही. साचलेल्या पाण्यात डुकरांचा वावर सुरू असून परिसरात असलेल्या बाभळी व इचूकाट्यांमुळे नागरिकांना जखमेचा धोका निर्माण झाला आहे. आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकार अत्यंत गंभीर असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांपासून नागरिकांकडून नगर परिषदेला वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. जामखेड तालुक्याला दोन आमदार असूनही रस्ते, पाणी व ड्रेनेज या मूलभूत सुविधांकडे कोणतंही लक्ष दिलं जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
या निष्क्रियतेमुळे जामखेड नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी मोकाट सुटल्याचे चित्र आहे. जबाबदारीने काम करणारा नेता पुढे येत नसल्याने नागरिकांना कोणतीही आशा उरलेली नाही. तालुक्यातील बहुतांश कामे प्रलंबित असून, सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. साई नगरसह इतर भागातही अशीच परिस्थिती असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
“प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वेळेवर योग्य उपाययोजना न केल्यास, आम्हाला रास्त आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल,” असा इशारा साई नगरमधील नागरिकांनी दिला आहे.



