बीड

खेळाडूवृत्तीचा उत्सव: बीड झोन मैदानी स्पर्धांचे श्री बंकटस्वामी महाविद्यालयातर्फे भव्य उद्घाटन”           

खेळाडूवृत्तीचा उत्सव: बीड झोन मैदानी स्पर्धांचे श्री बंकटस्वामी महाविद्यालयातर्फे भव्य उद्घाटन”
 बीड प्रतिनिधी  13 नोव्हेंबर 2025 रोजी येथील श्री बंकटस्वामी महाविद्यालय, बीड आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बीड झोन मैदानी स्पर्धांचा भव्य उद्घाटन समारंभ शारीरिक शिक्षण महाविद्यालय, बीडच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या स्पर्धेचे उद्घाटन श्री बंकटस्वामी शिक्षण संस्थेच्या सचिव सौ.सरोज गोपाळराव सोंडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री बंकटस्वामी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापु धोंडे, श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धांडे, उपप्राचार्य डॉ. शिवाजी मोरे, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ब्रह्मनाथ मेंगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रमुख उद्घाटक सौ. सरोज सोंडगे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “स्पर्धा कोणतीही असो, तिला खेळाडू वृत्तीने सामोरे जाणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात खेळाला महत्त्व दिल्यास आपले आरोग्य चांगले राहते. हार-जीत हा खेळाचा भाग असतो, परंतु मनोबल कायम उंच ठेवावे. स्पर्धेत सहभागी होणे हेच अर्धे यश आहे, आणि यशासाठी सातत्याने प्रयत्न करत राहावे.”
या प्रसंगी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बापु धोंडे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व आयोजक तसेच संयोजक मंडळाचे आभार मानले.तसेच डॉ.भागचंद सानप यांनी स्पर्धेचे नियम व अटी स्पर्धकांना समजावून सांगितल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शंकर धांडे यांनी केले, तसेच याप्रसंगी डॉ.आर. एम. काळे शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांनी देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा पर मनोगत व्यक्त केले. तर सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा.डॉ.राजीव काळे यांनी कुशलतेने पार पाडले.या स्पर्धेच्या आयोजनासाठी शारीरिक शिक्षण महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारीवर्गाने मैदानाची तयारी ते व्यवस्थापनपर्यंत उल्लेखनीय योगदान दिले.
विशेषतः डॉ.भीमा माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रमपूर्वक संपूर्ण तयारी केली.
या भव्य उद्घाटन समारंभाला बीड जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे खेळाडू विद्यार्थी, क्रीडा प्रेमी व संघप्रमुख तसेच अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button