बीड
मोंढा भागात ट्रान्सफार्मर बिघाड; महावितरणच्या तत्परतेमुळे रात्री वीजपुरवठा सुरळीत

मोंढा भागात ट्रान्सफार्मर बिघाड; महावितरणच्या तत्परतेमुळे रात्री वीजपुरवठा सुरळीत
परळी / प्रतिनिधी
आज गुरुवार, दि. 23 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास परळी शहरातील मोंढा परिसरातील डीपीला एका अज्ञात वाहनाची धडक बसल्याने ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाला. या अचानक घडलेल्या प्रकारामुळे दिवसभर मोंढा भागातील नागरिकांना वीजपुरवठ्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागला.
सध्या एप्रिल महिन्यातील कडक उन्हामुळे तापमान 40 अंशांपर्यंत पोहोचले असून, अशा परिस्थितीत वीज नसल्याने नागरिकांची अक्षरशः ससेहोलपट झाली. दरम्यान, महावितरणच्या (पॉवर हाऊस) कर्मचाऱ्यांनी भर उन्हात ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी अथक प्रयत्न केले; मात्र तांत्रिक बिघाड गंभीर असल्याने तो तत्काळ दुरुस्त करणे शक्य झाले नाही.
या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांनी अभियंता श्री. राठोड यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन त्यांनी तत्काळ निर्णय घेत अंबाजोगाई येथून नवीन ट्रान्सफार्मर मागवून घेतला. सायंकाळपर्यंत नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आणि रात्री सुमारे 8 वाजता वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला.
कडक उन्हात दिवसभर मेहनत घेऊन वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, त्यांच्या या तत्पर सेवेसाठी आभारही व्यक्त करण्यात येत आहेत.



