शेतीविषयक

“शेतकऱ्यांच्या उभारणीसाठी शासन कटिबद्ध; ३० जूनपूर्वी कर्जमाफी — कृषी मंत्री दत्तात्रय भरणे”

-पंकज हिरूळकर (जिल्हा प्रतिनिधी) अमरावती : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असून नैसर्गिक संकटांमुळे अडचणींना सामोरे जावे लागत असले तरी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असा विश्वास कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. शिराळा येथे आयोजित कृषी मेळावा व उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार 2025 कार्यक्रमात ते बोलत होते.

स्व. विनायकराव दादा देशमुख कृषी व शोध प्रतिष्ठानतर्फे कस्तुराबाई जैन विद्यालयाच्या प्रांगणात हा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी उत्कृष्ट व प्रयोगशील शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, आधुनिक शेतीत नवे प्रयोग करणाऱ्या महिला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.

कृषीमंत्री भरणे पुढे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीची अंमलबजावणी करण्यात येणार असून अमरावती जिल्ह्यासाठी 518 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले आहे. पात्र शेतकऱ्यांना सर्व योजनेचे लाभ लवकरच मिळतील.”
प्रशासन शेतकऱ्यांपर्यंत योजनांचे लाभ पोहोचवण्यास तत्पर असून शेतकऱ्यांनीही या योजना जास्तीत जास्त प्रमाणात वापराव्यात, असे त्यांनी आवाहन केले.

मेळाव्यात विविध कृषी अवजारे, कीडनाशके, आधुनिक फवारणी तंत्र, शेतीतील नवकल्पना याबाबत माहिती देण्यात आली. आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर यांनी केले.

Back to top button