बीड
ईमारत असूनही शाळेला जाणारा रस्ता बंद; महिनाभरापासून झाडाखाली भरते शाळा

ईमारत असूनही शाळेला जाणारा रस्ता बंद; महिनाभरापासून झाडाखाली भरते शाळा
पालकमंत्री अजितदादा पवार आणि आ. विजयसिंह पंडित यांना साकडे :– डॉ. गणेश ढवळे
बीड : (दि. २२) गेवराई तालुक्यातील टाकरवण जिल्हा परिषद केंद्रीय शाळा अंतर्गत दत्तनगर येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे गेल्या महिनाभरापासून झाडाखाली उघड्यावर बसून शिक्षण घ्यावे लागते. शाळेची इमारत असूनही शाळेला जाणारा मार्ग काही नागरिकांनी बंद केल्याने विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचार प्रमुख डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांनी पालकमंत्री अजितदादा पवार व आमदार विजयसिंह पंडित यांना ईमेलद्वारे निवेदन देत तातडीने रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली असून, जिल्हा प्रशासनाला आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
—
६ गुंठे दानजमिनीवर उभारलेली इमारत – तरीही रस्ताच नाही
दत्तनगर वस्तीतील ही शाळा १ ते ४ थीपर्यंत चालते. येथे सुमारे ३४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कैलास शिंदे यांनी दानपत्राद्वारे गट क्रमांक २४६ मधील ६ गुंठे जमीन दिल्यानंतर प्रशासनाने शाळेची पक्की इमारत उभारली. याच ठिकाणी अंगणवाडीही चालते.
शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी निर्माण झाली असतानाच रस्ता अडथळ्यामुळे संपूर्ण शिक्षणप्रक्रियेलाच तडा गेला आहे.
—
भोवती वाढलेल्या लोकवस्तीचे दुष्परिणाम — रस्ता बंद!
शाळेची इमारत उभी राहिल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढली. काही नागरिकांनी त्यांच्या जागेभोवती तारेचे कुंपण उभारून संपूर्ण मार्गच बंद केला. परिणामी विद्यार्थी शाळा डोळ्यासमोर दिसूनही तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
एक महिन्यापासून विद्यार्थ्यांना —
लिंबाच्या झाडाखाली बसून शिकावे लागते
उघड्यावरच अल्पोपहार घ्यावा लागतो
पिण्याचे पाणी उपलब्ध नाही
स्वच्छतागृह, पंखे, विजेची सुविधा नाही
यामुळे सर्दी, खोकला अशा आरोग्य समस्या वाढण्याचा धोका पालकांनी व्यक्त केला आहे.
—
शिक्षक-पालक त्रस्त; प्रशासनाचे मौन कायम
मुख्याध्यापक गणेश भुंबे यांनी सांगितले की,
“वारंवार लेखी सूचना देऊनही संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नाही. रस्ता दुरुस्तीसंबंधी कोणताही स्पष्ट निर्णय अथवा वेळापत्रक प्रशासनाने आजवर दिलेले नाही.”
पालक आणि ग्रामस्थांनीही या गंभीर दुर्लक्षाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
—
डॉ. गणेश ढवळे यांची मागणी
निवेदनात त्यांनी नमूद केले आहे —
शाळेला तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि नियमित शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी
दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
उपाय न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल.



