बीड
प्रमुख राज्य मार्ग क्र.16 च्या सुधारणा कामासाठी 966 कोटींची मंजुरी

प्रमुख राज्य मार्ग क्र.16 च्या सुधारणा कामासाठी 966 कोटींची मंजुरी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला हिरवा कंदील; आ. सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला यश;
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व आ.धस फोटो घ्यावा
आष्टी (प्रतिनिधी)
अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र.16 च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने तब्बल 966 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्य शासनाने या कामाला मंजुरी दिली असून हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांच्या आ.सुरेश धस यांचे स्वीय सहाय्यक नियोजन विभागाचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी दिली.
अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे 96 किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून वळणावळणाचा व काही ठिकाणी अत्यंत धोकादायक बनला होता. त्यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी तसेच परिसरातील नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणा व धोकादायक वळणांचे सरळीकरण करण्याची मागणी सातत्याने होत होती.
या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश धस यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला. विशेषतः म्हसोबाची वाडी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी या रस्त्याच्या सुधारणेची मागणी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत रस्ता सुधारणा करण्याचे आश्वासन दिले होते.
राज्य शासनाने आता या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान कि.मी. 13/100 ते 109/700 या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी 966 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. या कामामध्ये अनेक धोकादायक वळणांचे सरळीकरण, रस्त्याची गुणवत्ता वाढविणे तसेच वाहतुकीची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर भर दिला जाणार आहे.
या मार्गावरील टाकळी काझी, दौलावडगाव, पिंपरी, घाटा, कारखेल खुर्द, म्हसोबाची वाडी फाटा, धामणगाव, डोईठाण, हातोला, अमळनेर, डोंगरकिन्ही, गारमाथा, निरगुडी आदी गावांतील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. रस्त्याची सुधारणा झाल्यानंतर प्रवास अधिक सुरक्षित, जलद व सुलभ होणार असून अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे आभार मानले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर अहिल्यानगर-बीड मार्गावरील वाहतुकीला नवी गती मिळणार असून परिसराच्या विकासालाही चालना मिळणार आहे.



