बीड

रोजगार हमी योजनेला गती; लाभार्थ्यांना दिलासा आ.सुरेश धस यांची जिल्हाधिकाऱ्यासोबत मॅरेथॉन बैठक संपन्न

रोजगार हमी योजनेला गती; लाभार्थ्यांना दिलासा
आ.सुरेश धस यांची जिल्हाधिकाऱ्यासोबत मॅरेथॉन बैठक संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) मतदारसंघातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सुरू असलेल्या व प्रलंबित विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आ.सुरेश धस यांच्यासह जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन,मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पंचायत समिती आष्टी, पाटोदा व शिरूर (कासार) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सार्वजनिक व वैयक्तिक लाभाच्या कामांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत पाणंद रस्ते, शेत पाणंद, खडीकरण, जलसिंचन विहिरी, शेततळे, गायगोठे, शेळीशेड, घरकुल आदी कामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. अनेक ठिकाणी कामे पूर्ण होऊनही मजूर हजेरी, मस्टर जनरेशन, कुशल बिले व तांत्रिक त्रुटींमुळे देयके प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले. ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.द्वितीय रोजगार सेवकांचे आयडी व पासवर्ड, मस्टर हजेरीतील विसंगतीमुळे बंद असलेली कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावर काम मागणी अर्ज, ऑनलाईन मस्टर, वेज लिस्ट व एफटीओ प्रक्रिया सुसूत्रपणे राबविण्याचे स्पष्ट करण्यात आले.अनुसूचित जाती-जमाती, बचत गट व विधवा महिलांसाठी शेळीपालन शेड उभारणीसाठी नरेगा अंतर्गत कामे व बँक कर्ज सुविधा देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. तसेच जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण व अर्धवट कामांची प्रलंबित देयके तातडीने अदा करण्याचे निर्देश देण्यात आले.सोमवारी ही मॅरेथॉन बैठक पार पडली.यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Back to top button