बीड

शांतीनाथ महाराज सेवा आश्रमा जवळ सौर पथदिव्याचे उद्घाटन; भाजपा नेते मधुकर राळेभात यांच्या हस्ते लोकार्पण

शांतीनाथ महाराज सेवा आश्रमा जवळ सौर पथदिव्याचे उद्घाटन; भाजपा नेते मधुकर राळेभात यांच्या हस्ते लोकार्पण

जामखेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती यांच्या मार्गदर्शनाखाली व सहकार्याने जामखेड शहरातील महत्वाच्या १९ ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारे पथदिवे बसवण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याच उपक्रमांतर्गत शहरातील विंचरणा नदीकाठी असलेल्या सद्गुरू शांतीनाथ महाराज सेवा आश्रम या पवित्र स्थळी सौरऊर्जेवर चालणाऱ्या पथदिव्याचे उद्घाटन भाजपा नेते प्रा. मधुकर राळेभात यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी बोलताना प्रा. राळेभात म्हणाले, “या दिव्याच्या प्रकाशामुळे श्रद्धाळूंना उशिरापर्यंत समाधी स्थळी दर्शन घेता येणार आहे, हे माझ्यासाठी भाग्याचे क्षण आहेत. शांतीनाथ महाराज यांचा संजीवनी समाधी उत्सव भविष्यात अधिक भव्य स्वरूपात साजरा व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे.”

कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ (आबा) पोकळे, भाजपा शहरमंडळ अध्यक्ष संजय काशिद, नगरसेवक पवन राळेभात, अमित जाधव, शिक्षक नेते राम निकम, काँग्रेसचे राहुल उगले, विक्रांत घायतडक,चंद्रशेखर मोरे, सुधीर मोरे, ज्ञानेश्वर सानप, पुजारी नंदू खराडे तसेच परिसरातील नागरिक, भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन १९७२ साली सद्गुरू श्री शांतीनाथ महाराज यांनी या सेवाआश्रमात संजीवनी समाधी घेतली होती. दरवर्षी ज्येष्ठ शुद्ध षष्ठीला समाधी उत्सव पारंपरिक धार्मिक उत्साहात साजरा होतो. हरिनाम सप्ताह, पालखी सोहळे आणि कीर्तन-भजनाच्या माध्यमातून भक्तीभाव जागवले जातात. सौर दिव्यामुळे या धार्मिक स्थळी आता रात्रीच्या वेळेसही उजळ वातावरण उपलब्ध होणार असून, श्रद्धाळूंमधून आनंद व्यक्त केला जात आहे.

Back to top button