बीड
कारधा पोलिसांकडून अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई: १४ ट्रॅक्टर जप्त, ८२.७८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!

कारधा पोलिसांकडून अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई: १४ ट्रॅक्टर जप्त, ८२.७८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत!
*दै, सूर्योदय*:- भंडारा:-कारधा पोलिसांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत १४ ट्रॅक्टर जप्त केले असून, तब्बल ८२ लाख ७८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना बेलगाय/खमारी येथील वैनगंगा नदीच्या रेती घाटातून अवैधरित्या रेतीची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
यात वेगवेगळ्या कंपन्यांचे १४ ट्रॅक्टर आणि त्यांच्या ट्रॉल्या पकडण्यात आल्या. या ट्रॉल्यांमध्ये अंदाजे १३ ब्रास रेती होती. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ट्रॅक्टर, ट्रॉली आणि रेती यांचा समावेश असून त्याची एकूण किंमत ८२ लाख ७८ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी १४ ट्रॅक्टर चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२), ३(५) सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७, ९ आणि मोटर वाहन कायदा कलम ५०/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक साखरे,पोलीस हवालदार सुरेश सिडाम (ब.नं/४४१) आणि कारधा पोलीस स्टेशनच्या इतर कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई पार पाडली.या प्रकरणाचा पुढील तपास कारधा पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.



